

पुणे : जांभूळ मधामध्ये रक्तातील साखरेवर तुलनेने कमी परिणाम करणारे गुणधर्म असल्याचे आणि त्याचबरोबर शरीराला संरक्षण देणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या या अभ्यासामुळे जांभूळ मधाला नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, शास्त्रज्ञ डॉ. उदय किरण मारेल्ली यांनी या संशोधनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते. डॉ. उदय किरण मारेल्ली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटामध्ये स्नेहल वाघोले, शिरीन मॉन्सी, सपना रवींद्रनाथन यांचा समावेश होता. आशिष लेले म्हणाले, महाबळेश्वरच्या डोंगराळ परिसरातून जमा केलेल्या ८२ अस्सल जांभूळ मधाच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
* माय्रिसेटीन, केम्पफेरॉल असे १२ प्रकारचे नैसर्गिक घटक
* हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर
* मधाचे खराब होण्याचे प्रमाण कमी; हे मध दीर्घकाळ टिकते
* ग्लुकोजचे प्रमाण खूपच कमी (१०० ग्रॅम मधात २५.९१ ग्रॅम)
* ग्लुकोज, फ्रुक्टोजचे एकूण एकत्रित प्रमाणही इतर मधांपेक्षा कमी.
* या मधाचा रक्तातील साखर वाढवण्याचा वेग अत्यंत कमी