नाट्यसंमेलनानिमित्त होणार नाट्यकलेचा जागर स्पर्धात्मक महोत्सव

नाट्यसंमेलनानिमित्त होणार नाट्यकलेचा जागर स्पर्धात्मक महोत्सव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित शंभरावे नाट्य संमेलन जानेवारी ते मे 2024 या कालावधीत रंगणार असून, नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर नाट्य जागर होणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत, नाट्यकर्मींसाठी नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याशिवाय नाट्यसंमेलनाचा शुभारंभ करण्याचा बहुमान पुणे शाखेला मिळाला असून, 5 जानेवारीला पुण्यात नाट्यसंमेलनाची नांदी होणार आहे, यानिमित्ताने पुणे शाखेतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नाट्यकलेचा जागर या स्पर्धात्मक महोत्सव विविध 22 केंद्रांवर होणार असून, पुण्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, बीड, नांदेड, मुंबई आदी केंद्रांवर महोत्सव रंगणार आहे. यात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा आणि नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होतील. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन फेर्‍यांमध्ये होईल. 15 जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरू होऊन त्यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरीचे आयोजन केले आहे.

अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी चार दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले असून, व्यावसायिक कलावंतांसह महाराष्ट्रातील हौशी कलावंतांना नाट्यसंमेलनात कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे. या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. प्रवेशिका 31 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, अशी माहिती पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. यानिमित्ताने गणेश कला क्रीडा मंच येथे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते गणेश कला क्रीडा मंचपर्यंत सकाळी आठ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे, तर गणेश कला क्रीडा मंच येथे होणार्‍या विशेष कार्यक्रमात नाट्य संकीर्तन हा कार्यक्रम कीर्तनकार चारुदत्त आफळे सादर करतील. याशिवाय संगीत नाटकातील प्रवेश आणि गीतांचा कार्यक्रम विविध संस्थांमधील कलाकार सादर करतील, अशी माहिती पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news