बदलापूर प्रकरणानंतर पुण्यातील शाळा 'alert mode

पुण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवारपासूनच पावले उचलली
पुण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवारपासूनच पावले उचलली
पुण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवारपासूनच पावले उचललीPudhari
Published on
Updated on

बदलापूर येथील निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या पुण्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवारपासूनच पावले उचलल्याचे ’पुढारी’च्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे शहरातील बहुतांश शाळा विद्यार्थ्यांच्या विविध सोयी-सुविधांसाठी अलर्ट मोडवर गेल्याचे दिसून आले.

शाळा व शाळांच्या परिसरामध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी महापालिकेच्या वारजे येथील दिगंबरवाडीमधील कै. श्यामराव श्रीपती बराटे शाळेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात आहे. मुलींच्या स्वच्छतागृहांबाहेर कायम तैनात असणार्‍या सेविका, शाळेच्या परिसरामध्ये पुरेसे सीसीटीव्ही, मुलांशी आणि मुलींशी सातत्याने संवाद यामुळे शाळेमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दै. ‘पुढारी’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीमध्ये पाहायला मिळाले.

एकीकडे शासकीय शाळांबाबत समाजात नकारात्मक दृष्टी असताना या शाळेमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासोबत शाळेच्या बाहेरील परिसरावरही नजर ठेवणे सुकर होत आहे. प्रवेशद्वार, वर्‍हांडा, वर्ग, स्वच्छतागृहांकडे जाणारा मार्ग आदी ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविता यावी, यासाठी तक्रारपेटीचीही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुड टच बॅड टचबाबत मुलांना कळावे, यासाठी गप्पागोष्टींच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मुलांना शाळेमध्ये सुरक्षित वाटत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

‘तिसरा डोळा’ कशासाठी हवा?

  • शाळेच्या परिसरात बाहेरचे कोणी आले असल्यास तत्काळ विचारणा करता येते.

  • मधल्या सुटीत मैदानावर विद्यार्थ्यी काय करतात, भांडण करतात का, हे पाहता येते.

  • शाळेच्या परिसरातील झाडीमध्ये काही गैरप्रकार होत नाहीत ना, यावर नजर ठेवता येते.

  • शाळेच्या परिसरात एखादा गुन्हा घडल्यास पोलिसांकडून शाळेच्या सीसीटीव्हीची मदत घेतली जाते.

नवीन मराठी शाळा लई भारी

शनिवार पेठ येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत बुधवारी दै. ‘पुढारी’च्या वतीने पाहणी करण्यात आली. ही शाळा पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या वेळी या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व समित्या कार्यरत असल्याचे पाहायला मिळाले. या शाळेत विद्यार्थी वाहतुकीसाठी आवश्यक असलेली शालेय परिवहन समिती कार्यरत होती. यासोबतच लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आवश्यक असलेली ‘सखी समिती’ होती. यासोबतच माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, अंतर्गत तक्रार समित्या देखील येथे कार्यरत असल्याचे पाहायला मिळाले.

दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने शाळेत प्रवेश करताच दरवाजावर रोखण्यात आले. यावरूनच शाळेची सुरक्षाव्यवस्था देखील चांगली असल्याचे पाहायला मिळाले. 24 तासांसाठी या शाळेत सुरक्षारक्षकांची, मावश्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला असता ते म्हणाले, शाळेच्या स्वच्छतागृहांसाठी अटेंडन्स म्हणून मावश्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सखी समिती आमच्याकडे शाळेत आहे. शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षक आहेत. शाळेच्या वेळेत कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. आमच्याकडे सर्वाधिक महिला शिक्षिका आहेत. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. तसेच, शाळा सुटल्यावर आम्ही विद्यार्थ्यांना पालकांशिवाय कोणाच्याही ताब्यात देत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वाधिक लक्ष ठेवले जात आहे.

आमच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या माध्यमातून दैनंदिन रेकॉर्डिंग केले जाते. स्वच्छतागृहाजवळ कायम महिला उभ्या केलेल्या असतात. सुरक्षारक्षकांना शाळेच्या आवारात येणार्‍या प्रत्येकाची नोंद करूनच आत पाठविण्याचे निर्देश आहेत. शाळेत सखी-सावित्री समिती स्थापन केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील सुविधांचे ऑडिट केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाते.

- कल्पना वाघ, मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा

'अहिल्यादेवी' मध्ये बाऊन्सर

शनिवार पेठेतील अहिल्यादेवी मुलींच्या शाळेची दै. ‘पुढारी’कडून बुधवारी पाहणी करण्यात आली. सुरक्षारक्षक, बाऊन्सर यांची कडक सुरक्षा असल्याचे पाहायला मिळाले. तसेच शाळेला एकच प्रवेशद्वार होते. तेही मोठ्या भव्य लोखंडी दरवाजाने सतत बंद असल्याचे दिसले.

या वेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका अनिता भोसले यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी त्या म्हणाल्या, आमची मुलींची शाळा असल्यामुळे आम्ही मुलींच्या सुरक्षेबाबत खूपच खबरदारी घेत असतो. शाळेच्या वेळेत कोणालाही प्रवेश नाही. तसेच, शाळा सुटल्यावरही मुलांना त्यांच्या पालकांच्याच स्वाधीन केले जाते. त्यांना कोण न्यायला येणार आहे, याबाबतची नोंद आम्ही आमच्याकडे रजिस्टरमध्ये केली आहे. पालकांव्यतिरिक्त कोणीही आले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वाधीन केले जात नाही. लगेचच पालकांशी संपर्क केला जातो. पालकांशिवाय कोणत्याही नातेवाइकांकडे मुलांना सोपविले जात नाही. यासोबतच शाळेला सुरक्षारक्षकांसह बाऊन्सर, मावशी आणि शिपायांच्या सुरक्षेचे कडे आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा याला आमचे प्राधान्य असते. विद्यार्थिनींच्या तक्रार निवारणासाठी आमच्याकडे समिती आहे. तसेच, सुरक्षित शालेय वाहतुकीसाठीसुद्धा आमच्याकडे शालेय परिवहन समिती आहे. दरवर्षी या वाहनचालकांचे फिटनेस सर्टिफिकेट तपासले जाते.

ताईमुळं पळाली भीती

‘मला कधीही वॉशरूमला जायचं असेल तर ताई (सेविका) आमच्यासोबत असते. त्या आमची खूप काळजी घेतात, त्यांच्यामुळे शाळेत अजिबात असुरक्षित वाटत नाही. मॅडम आम्हाला वर्गात गुड टच बॅड टचबाबत माहिती देतात. आई-बाबांनीही याबद्दल सांगितलं आहे’... सहावीत शिकणारी आर्वी (नाव बदललं आहे) शाळेबद्दल निर्धास्तपणे सांगत होती.

बदलापूरमधील शाळेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पाहणीत आर्वी बोलत होती. नाना पेठेतील कै. शांताबाई लडकत इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. शाळेमध्ये सखी-सावित्री समिती स्थापन केली असून, त्याअंतर्गत बैठका होऊन विशेष म्हणजे शाळेत समतेचे वातावरण ठेवून लिंगभेदविरहित आणि सर्वसमावेशक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, शाळेच्या मैदानावर मुले-मुली एकत्र खेळत होती. खेळण्यात दंग झालेल्यांनी थकल्यानंतर मैदानावर बैठक मारली, त्या मुलींनी न घाबरता संवाद देखील साधला.

मुख्याध्यापिका रेश्मा जाधव म्हणाल्या, शाळेत मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते. गुड टच बॅड टचबाबत आम्ही एका सामाजिक संघटनेला बोलावून मुलींना माहिती देतो. शिवाय मुलींसोबत आणि मुलांसोबतही सेवक-सेविका वॉशरूमपर्यंत जातात. शिवाय शिक्षक, सेवकांचे मैदानावर खेळणार्‍या मुलांवर देखील बारकाईने लक्ष असते. स्वच्छतेसाठी बाहेरून आलेले कर्मचारी सर्व साफसफाई करून जात नाहीत, तोवर मुले-मुलींना सोडले जात नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news