

पुणे : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे दिली. दरम्यान, अजित पवारांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत कोकाटे यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवर्यात सापडलेले कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी स्वतः आधी कोकाटे यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल; मगच पुढील निर्णय घेणार आहोत. याबाबतचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचे आणि कोणाला वगळायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.
कोकाटे यांच्याबद्दल अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशीही चर्चा करणार आहेत. नंतर ते कोकाटे यांनाही भेटायला बोलावतील, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा की, त्यांचे खाते बदलायचे, यावरूनही राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. कारण, याआधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता कोकाटे यांनाही मंत्रिमंडळातून काढले, तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असे राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते. कोकाटे यांचा राजीनामा घेतला, तर रोहित पवार व अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो, असा संदेश जनमानसात जाईल, असाही एक प्रवाह आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यावर कोणती कारवाई होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नंदुरबार दौर्यावर असलेले कृषिमंत्री कोकाटे यांनी शनिवारी सकाळीच देशात साडेसातीमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील एकमेव शनी मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. यावेळी आपल्या मागे लागलेली साडेसाती दूर होऊ दे, असे साकडे मी शनिदेवाला घातल्याची माहिती त्यांनी दिली.