

भोर: येथील नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार करून ठेवीदारांच्या एकूण 40 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापक, सचिव यांच्यासह कर्जदारावर बुधवारी (दि. 18) भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सहकारी संस्था पुणे लेखापरिक्षक वर्ग 2 चे जयसिंग सखाराम गायकवाड यांनी याबाबत भोर पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या 25 जून 2010 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या आर्थिक व्यवहारात तत्कालीन संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक यांनी संस्थेच्या निधीचे बेकायदेशीरपणे पोटनियमबाह्य पुस्तकी नोंदी करून असुरक्षित तारणांवर व विनातारण उचल करून संगनमताने ठेवीदारांची 39 कोटी 87 लाख 97 हजार 717 रुपयांची फसवणूक, अपहार, अफरातफर व बेकायदेशीर गैरव्यवहार करून संस्थेला आर्थिक तोट्यात आणण्याचे काम केले असल्याने रितसर आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Pune News)
यामध्ये तत्कालीन अध्यक्ष भास्कर बाबूराव किंद्रे (रा. बालवडी), तत्कालीन उपाध्यक्ष सूर्यकांत बबन शिंदे (रा. बाजारवाडी), तत्कालीन संचालक श्रीधर रघुनाथ किंद्रे (रा. बालवडी), रघुनाथ बाबूराव भोसले (रा. पाले), विजय गोविंद खळदकर (रा. नेरे), सुनील शिवाजी म्हस्के (रा. पळसोशी), अजित तुकाराम गायकवाड (रा. बालवडी), श्रीमती उषा सुरेश तांगडे (रा. माझगाव), छाया गोकुळ फणसे (रा. बालवडी), सचिव सोपान हरिभाऊ सावले (रा. नेरे), व्यवस्थापक रामचंद्र गणपती मांढरे- भोर शाखा (रा. नेरे), रंजना शशिकांत किंद्रे- धनकवडी शाखा (रा. बालवडी), चंद्रकांत शंकर सरपाले- वेल्हे शाखा (रा. वेल्हे), रवींद्र विठ्ठल कुडले- नसरापूर शाखा (रा. करंजे) याच्यासह कर्जदार व पतसंस्था संचालक मंडळ मिळून एकूण 112 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तब्बल 40 कोटींची फसवणूक, अपहार, अफरातफर व गैरव्यवहार करून संस्थेला आर्थिक नुकसान करीत ठेवीदारांची फसवणूक केल्यामुळे कर्जदारामध्ये धावपळ उडाली आहे.
सहकारी संस्थेचा ताळेबंद
नेरे विभाग नागरी सहकारी संस्थेच्या ताळेबंदानुसार आजतागायत ठेवी 30 कोटी, कर्ज 30 कोटी, संचित तोटा 4 कोटी 25 लाख, व्याज 10 कोटी आणि सभासद संख्या 3 हजार 425 अशी आहे.
नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्यामुळे वरिष्ठाच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून केला जाईल.
- आण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक भोर