अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी संस्थास्तरीय, तसेच व्यवस्थापन कोट्यांतील प्रवेश हे नियमानुसारच करावेत. नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास, ते प्रवेश रद्द होतील, अशा सक्त सूचना राज्य सार्माइक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिल्या आहेत. ही प्रवेश प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी शैक्षणिक संस्थांना सूचना द्याव्यात, असे आदेशही आयुक्त सरदेसाई यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) संचालकांना दिले आहेत.
पुण्यात नामांकित शैक्षणिक संस्थांनी सीईटी सेलकडून राबविण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियांच्या फेर्या संपण्यापूर्वीच (कॅप राउंड) संस्थास्तरीय, तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सुरू केले आहेत. हे प्रवेश करण्यासाठी नियम 13 नुसार कार्यवाही करण्याचे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. याबाबत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पुण्यातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांची सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत सरदेसाई यांनी परिपत्रक प्रसिद्ध करीत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना आदेश दिले आहेत.
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका शैक्षणिक संस्थेत नियमबाह्य पद्धतीने संस्थास्तरीय, तसेच व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश झाल्याची तक्रार पुराव्यानिशी करण्यात आली आहे. या शैक्षणिक संस्थेत नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या (एआरए) स्तरावर रद्द करण्यात येतील, याची जाणीव संस्थेला करून द्यावी. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठविण्यात यावा, असे आदेशही सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी डीटीईला दिले आहेत.
कॅप राउंडनंतर रिक्त राहणार्या, तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांची माहिती जाहिरातीद्वारे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे.
रिक्त जागांची नोटीस फलकावर किंवा वेबसाइटवर प्रसिद्ध करणे.
रिक्त जागांवर प्रवेशासाठी अर्ज मागविणे.
अर्जांनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रवेशाची यादी प्रसिद्ध करणे.
यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देणे.