

आशिष देशमुख
पुणे : भारतातील वाघांच्या ‘डीएनए’ (जेनेटिक्स) मध्ये होणारे बदल, जनुकीय विविधता, इनब्रीडिंग म्हणजे एकाच वंशातील नातेसंबंधातून जन्मलेल्या वाघांच्या बछड्यांची शारीरिक क्षमता, वजन आणि वयोमानावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आल्याचे मत बंगळूर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. उमा रामकृष्णन यांनी खास ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त हा खास रिपोर्ट...
भारतातील वाघांच्या ‘डीएनए’ (जेनेटिक्स) मध्ये होणारे बदल, जनुकीय विविधता, इनब्रीडिंग म्हणजे एकाच वंशातील नातेसंबंध आणि वेगवेगळ्या व्याघ्र अधिवासांतील वाघांमधील जनुकीय संबंध, यावर भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. वाघांचा व्यवहार, त्यांची चाल, पायाचे पंजे, आक्रमकतेबाबत डेटा गोळा केला जात आहे. तसेच, त्यांची लघवी, विष्ठा यांचेही पृथक्करण वारंवार केले जात आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून २९ जुलै हा दिवस जगात साजरा केला जातो.
संशोधनातील मुख्य मुद्दे...
भारतातील नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ॲथॉरिटी आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वाघांच्या ‘डीएनए’वर सातत्याने संशोधन सुरू आहे.
वाघांची विष्ठा, केस, ऊती (टिश्यू) आणि रक्ताचे नमुने तपासून ‘डीएनए’ विश्लेषण केले जात आहे.
यातून वाघांमधील नातेसंबंध, जनुकीय विविधता, स्थलांतर इनब्रीडिंगचा धोका तपासला जात आहे.
भारतात सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प (ओडिशा) येथे इनब्रीडिंग सर्वाधिक चर्चेत आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, भारतात सर्वाधिक गंभीर जनुकीय आणि इनब्रीडिंगची चिंता सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात आहे.
येथील काही वाघांमध्ये आढळणारे छद्म-कृष्ण (ब्लॅक टायगर) हे स्वरूप लहान आणि वेगळ्या पडलेल्या संख्येमुळे वाढलेल्या इनब्रीडिंगशी संबंधित असल्याचे संशोधनात नमूद केले आहे.
याच कारणामुळे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रातील ताडोबा येथून वाघीण ‘झीनत’ला सिमिलीपालमध्ये स्थलांतरित करण्यात आले; जेणेकरून नवीन जनुकीय विविधता वाढेल.
अधिकृत सरकारी अहवालात राजस्थानातील रणथंभोरला सिमिलीपालइतका गंभीर इनब्रीडिंगचा भाग म्हणून घोषित केलेले नाही. मात्र, अनेक शास्त्रज्ञांनी या संख्येतील जनुकीय विविधता टिकविण्यासाठी इतर व्याघ्र क्षेत्रांशी वन्यजीव कॉरिडॉर आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
इनब्रीडिंग म्हणजे काय?
इनब्रीडिंग म्हणजे जवळच्या नात्यातील नर आणि मादी यांच्यात वारंवार प्रजनन होणे. वाघांबाबतीत एखादे व्याघ्र क्षेत्र इतर जंगलांपासून वेगळे पडणे आणि नवीन नर किंवा मादी वाघ तिथे येऊ शकले नाहीत, तर त्याच कुटुंबातील किंवा जवळच्या नात्यातील वाघांमध्ये प्रजनन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जनुकीय विविधता कमी होते.
इनब्रीडिंगचे परिणाम?
जनुकीय विविधता कमी होते.
रोगप्रतिकारक क्षमता घटू शकते.
जन्मजात दोष वाढीची शक्यता असते.
दीर्घकाळ प्रजाती टिकून राहण्यावर परिणाम होऊ शकतो.