पुणे: अवैध पद्धतीने मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करणार्या दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. योगेश राऊत (वय 25), निसार शेख (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किंमतीच्या 180 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. नशा आणि बॉडीबिल्डिंग करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो. आरोपी पाचशे रुपयांना एका इंजेक्शनची विक्री करत होते.
याप्रकरणी दोघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगेश हा बी. फार्मेसी झाल्याचे सांगतो. मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी पोलिसांना मिळून आलेली नाही. तर निसार हा बारावी पास आहे.
हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, आरोपी योगेश आणि निसार हे दोघे मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनची अवैध पद्धतीने विक्री करत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दोघा आरोपींनी कोणत्याही प्रकारचे औषध विक्री करण्याचे शिक्षण घेतलेले नाही. संबंधित औषध हे केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास किंवा व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्या व्यक्तीला गंभीर इजा होऊ शकते. हे माहिती असूनदेखील नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकादेशीररीत्या ते बाळगल्याचे आढळून आले आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, नीलेश किरवे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, अमित साखरे, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली.
तरुणीकडेही सापडले होते मेफेन्टरमाइन
यापूर्वी देखील एका तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेन्टरमाइन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) 160 बाटल्या जप्त केल्या होत्या. अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय 26, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव होते. तिच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हे होतात दुष्परिणाम
भीती वाटणे, भास होणे, चिडचिड होणे.
जास्त प्रमाणात घेतल्यास मृत्यूची शक्यता.
हृदयविकाराचा धोका, हृदय निकामी होऊ शकते.
तात्पुरते फ्रेश वाटते, पण त्याची सवय लागते.
वेगाने गाडी चालवणे; भांडणे करण्यास उद्युक्त होणे.
अवैध पद्धतीने मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करताना दोघांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून 190 बाटल्या जप्त केल्या आहेत. अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांनी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
- संजय मोगले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.