आशिष देशमुख
पुणे: पुणे-मुंबईतील उंचच उंच इमारतींमुळे आजवर तेथे पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीचा स्पष्ट अंदाज घेता येत नव्हता. मात्र, आता या महानगरात चार एक्स बँड रडार अन् तब्बल 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आल्याने अतिवृष्टीचा अंदाज चार ते सहा तास आधीच देता येणार आहे. त्यामुळे मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. केरळमधील वायनाडच्या दुर्घटनेतून धडा घेत केंद्र सरकारने हा प्रयोग मुंबईत केला आहे.
आज 23 मार्च जागतिक हवामान दिन. हा दिवस 1961 पासून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशातील पहिल्या प्रयोगाची माहिती प्रथमच दैनिक ‘पुढारी’ने लोकांसमोर आणली आहे. पुणे, मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मान्सूनमध्ये अतिमुसळधार पावसाच्या रात्री अंगावर शहारे आणणार्या ठरल्या आहेत.
हा पाऊस इतका जोराचा असतो की, याचे बारकावे टिपणे आजवर अशक्यप्राय वाटत होते. मात्र, हवामान विभागाने अत्यंत अद्ययावत पद्धतीचे एक्स ब्रँड प्रकारचे चार रडार मुंबईत बसवल्याने प्रत्येक स्टेशनवरचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि समुद्रातील लाटांच्या लहरी मोजणी आता शक्य झाले आहे. हा पहिलाच प्रयोग भारतामध्ये मुंबईत करण्यात आला.
वायनाडपासून धडा घेतला
मुंबईत विजांचे कडकडाटदेखील खूप मोठ्या प्रमाणावर होऊन नुकसान होत असते. याचे मोजमाप अत्यंत बारकाईने व शास्त्रीय पद्धतीने आजवर होत नव्हते. हा अभ्यास करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईत विविध ठिकाणी चार एक्स बँड रडार बसवून तेथील पावसाचा अंदाज देणारा प्रयोग भारतात प्रथमच 2024 च्या मान्सूनमध्ये केला आणि अंगावर शहारे आणणार्या नोंदी जगासमोर आल्या. वायनाड येथे झालेल्या घटनेवरून धडा घेत सरकारने हा प्रयोग मुंबईत केला आहे.
मुंबईत 139 हवामान केंद्रांचे नेटवर्क
डॉ. हरिकृष्णन यांनी सांगितले की, भारत सरकारने अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग मुंबईत केला आहे. मुंबईत उंचच उंच इमारती आहेत. त्यामुळे त्या इमारतींच्या खालच्या उंचीवरील ढगांचा अभ्यास करणे आजवर कठीण काम होते. त्या ढगांची स्थिती काय आहे, तेथील वार्यांचा वेग, विजांचा कडकडाट याचे बारकावे इतर प्रकारच्या रडारमध्ये नोंदवले जात नव्हते. अशावेळी अत्यंत संवेदनशील आणि अद्ययावत असणार्या एक्स बँड रडारचा प्रयोग मुंबईत करण्याचे ठरले.
त्याप्रमाणे मुंबईत चार एक्स बँड रडार बसवले गेले आणि 2024 च्या पावसाळ्यातील बारकावे त्याने टिपले. तेव्हा सप्टेंबर 2024 मधील मान्सूनचा रुद्रावतार प्रथमच नोंदवला. त्यासाठी मुंबईत 139 हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पावसाचा, ढगफुटीचा अंदाज किमान चार ते सहा तास आधी देता येणार आहे.
सप्टेंबरमध्ये दिसले रौद्ररूप
यात 23 ते 26 सप्टेंबर 2024 या तीन दिवसातले हजारो रीडिंग अत्यंत बारकाव्यासह टिपले आहेत. यात सर्वाधिक पाऊस हा 24 सप्टेंबर 2024 रोजी झाला. त्या एका रात्रीत मुंबईच्या 139 हवामान स्टेशनवर तब्बल 11 हजार 741 विजांच्या कडकडाटाची नोंद झाली, तर एका तासात 232 मिलिमीटर पाऊस या सर्व स्टेशनवर झाल्याचे रेकॉर्ड मिळाले.
एक्स बँड रडार नेमके काय करते?
- रडारमध्ये सी बँड, एस बँड, एक्स बँड, डॉप्लर रडार असे प्रकार आहेत. केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनानंतर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तेथे एक्स बँड रडार बसवण्यास मान्यता दिली.
- हे रडार इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या एक्स बँडमध्ये रेडिओ लहरी उत्सर्जित करते.
- भूस्खलनाची चेतावनी देते. मातीसारख्या अतिसूक्ष्म कणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत करते.
- लहान पाण्याचे कण आणि बर्फाच्या कणांचा आकाराचा अंदाज देते.
- हे रडार रेडिओ डिटेक्शन आणि रेंजिंगसाठी उपयुक्त आहे.
- हे रडार रेडिओ लहरींचा वापर करून त्या उपकरणाभोवती असलेल्या वस्तूंचे अंतर, वेग आणि भौतिक वैशिष्ट्ये निश्चित करते.
- यातील ट्रान्समीटर हे ढगांच्या दिशेने रेडिओ लहरी उत्सर्जित करतात आणि पुन्हा परावर्तित होऊन माहिती देतात.
- उत्सर्जित सिग्नल ढंगांचा अभ्यास करून परत येऊन फोटोसह माहिती देतात. रिसिव्हर त्याचा मागोवा घेतो आणि त्याचे विश्लेषण करतो.
24 तासांत 11 हजार 741 विजांचा कडकडाट
24 सप्टेंबर 2024 रोजी 24 तासांत मुंबईतील 139 हवामान केंद्रांवर तब्बल 11 हजार 741 विजांचा कडकडाट झाला. याच्या नोंदी एक्स बँड रडारमुळे शक्य झाल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. हरिकृष्णन देवशेट्टी यांनी नुकतीच जागतिक हवामान परिषदेत दिली होती. डॉ. हरिकृष्णन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या संस्थेत ‘ब’ वर्ग शास्त्रज्ञ म्हणून काम करतात.
मुंबईचा विस्तार हा प्रचंड गुंतागुंतीचा असल्याने तेथे चार रडार बसविण्यात आले. यात अॅडव्हान्स मायक्रो फिजिक्स तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ज्यामुळे सुमारे 2 ते 120 किलोमीटर परिसरातील हवामानाचा अभ्यास करता येतो. ढगांची स्थिती त्यातील धन आणि ऋण भार याचा अभ्यास करते. पाऊस कुठे, किती पडणार आहे, याचाही अंदाज हे रडार देते. या तंत्रज्ञाला ‘मोझाईक’ असे नाव देण्यात आले असून, त्यावर मी शोधनिबंध लिहिला आहे. हा शोधनिबंध अजून प्रदर्शित होणे बाकी आहे. त्यात अनेक बारकावे नोंदवले आहेत.
- डॉ. हरिकृष्णन देवशेट्टी, शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे