

पुणे : भारतीय एरोस्पेस संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वांत मोठे रेडिओ कंट्रोल्ड इलेक्ट्रिक फिक्स्ड विंग विमान विकसित करून इतिहास घडविला आहे. टीम स्कायट्रेकने तयार केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रोजेक्ट गरुडा असे नाव देण्यात आले असून, त्याची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे.
एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी पूर्णपणे स्वबळावर डिझाईन केलेले हे विमान 9.25 मीटर विंगस्पॅन आणि 261 किलो वजनासह भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वाधिक वजनाचे आरसी इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या केंद्रामार्फत 48 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या विमानाच्या निर्मितीपासून ते उड्डाणापर्यंतची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळली. स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स, फ्लाईट कंट्रोलर सिस्टीम, आरटीके-जीपीएस नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन आणि फ्लाइट टेस्टिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करण्यात आला.
गेल्या चार वर्षांत विद्यार्थ्यांना अनेक अपयशी चाचण्या, हवामानातील अडथळे आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र सातत्यपूर्ण संशोधन आणि सुधारणा करीत अखेर 4 मे 2026 रोजी धुळे येथील धावपट्टीवर प्रोजेक्ट गरुडाने यशस्वी टेकऑफ आणि सुरक्षित लँडिंग केले. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी या यशाचे वर्णन अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण असे केले. भविष्यात टीम स्कायट्रेक ई-व्हीटॉल एअर टॅक्सी, स्वॉर्म ड्रोन आणि प्रगत यूएव्ही संशोधनावर काम करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.