पुणे : कोणतेही यान असो वा लष्करासाठी साहित्यनिर्मिती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वीपर्यंत आपण विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होतो. ही परिस्थिती गत दहा वर्षांत झपाट्याने बदलली असून, आपल्या स्वदेशी स्टार्टअपने देशाला स्वयंपूर्ण बनविले आहे. चांद्रयान, आदित्ययान ते लष्करी सामर्थ्य तरुणांच्या स्टार्टअपने वाढविण्यात मोठा हातभार लावला आहे. आपल्या देशात स्टार्टअपने मोठी भरारी घेतली असून, ते झपाट्याने देशाच्या विकासात क्रांती आणत आहेत.
16 जानेवारी हा स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त भारतीय स्टार्टअपची कामगिरी उल्लेखनीय मानली जात आहे. चांद्रयानात देशातील सहाशे ते सातशे स्टार्टअपने विविध उत्पादने तयार करून दिली. यात देशाच्या कानाकोपर्यातून स्टार्टअपने सुट्टे भाग बनवून दिले तसेच आदित्य एल-1 या यानातही जे पेलोट बनविले त्यातही स्टार्टअपचा मोठा सहभाग होता.
हवाईदलप्रमुख महिनाभरापूर्वीच सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात आले होते. त्यांनी भारतीय स्टार्टअपची कामगिरीच त्यांच्या सादरीकरणात दिली. ते म्हणाले, पुढची युद्धे ही सर्वाधिक प्रमाणात ड्रोनच्या साहाय्याने होणार आहेत. ती बाब लक्षात घेत हवाईदल मानवरहित विमानांवर भर देत आहे. यात स्टार्टअपची मोठी कामगिरी आहे. ड्रोननिर्मितीसाठी हवाईदलाकडे सध्या तब्बल दोन हजार कोटींच्या ऑर्डर्स आहेत. त्यापैकी 800 कोटींच्या ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत.
लष्करप्रमुख मनोज पांडे यांनीही एनडीएच्या पदवीदान कार्यक्रमात भारतीय स्टार्टअपचे कौतुक केले. युद्धभूमी अवघड अन् क्लिष्ट बनत चालली असल्याने लष्करात अत्याधुनिक मानवरहित तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहोत. रणगाडा, ड्रोनसह अनेक यंत्रे तयार करण्यात स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात आहे.
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना लागणारे साहित्य पुण्यातील 'डीआरडीओ' ही संस्था करते. दोनच दिवसांपूर्वी येथे देशभरातून आलेल्या प्रदर्शनात 80 पेक्षा जास्त स्टार्टअप सहभागी झाले होते. मानवरहित रणगाडा, कार, बोटी, रोबो पाहावयास मिळाले. यात पुणे, मुंबई या महाराष्ट्रातील स्टार्टअपसह देशाच्या कानाकोपर्यातून तरुण, स्टार्टअपचे सीईओ आले होते.
'सुखोई' हे लढाऊ विमान सध्या संपूर्ण रशियन बनावटीचे आहे. त्याचे संपूर्ण स्वदेशीकरण करण्यात येत आहे. नाशिकच्या एचएएल कंपनीने हे आव्हान घेतले असून, यात स्टार्टअपचा मोठा सहभाग राहणार आहे. सुखोई 30 एमकेआय, मिग 29 यांचे तंत्रज्ञान 30 ते 35 वर्षे जुने आहे. त्याला भारतीय तंत्रज्ञानाने अपग्रेड करण्यात तरुणांच्या स्टार्टअपना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे.
'डीआरडीओ' भारतीय तरुणांच्या स्टार्टअपना मोठ्या प्रमाणावर लष्कराच्या तिन्ही दलांसाठी लागणार्या लढाऊ साहित्यनिर्मितीत प्रोत्साहन देत आहे. आता नौदलासाठी पाण्यातून फिरणारे ड्रोन हे आव्हानात्मक कामही हाती घेण्यात आले आहे.
– डॉ. शैलेद्र गाडे, संचालक, आर्ममेंट अँड कॉम्बॅक्ट इंजिनिअरिंग सिस्टीम, 'डीआरडीओ', पुणे
मी लंडनमधून अभियांत्रिकी शिकलो, पुढे मास्टर्सही तेथेच केले. आता मुंबईत येऊन स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. मी भारतीय लष्करासाठी सर्वाधिक प्रमाणावर वायरलेस यंत्रणा विकसित करत आहे.
– राहुल अग्रवाल, संचालक, एक्सिकॉम स्टार्टअप, मुंबई
हेही वाचा