पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्यदलात कोणालाही काहीही झाले तरी देखील केवळ सैनिकच नाहीत, तर संपूर्ण देश विसरत नाहीत. सामान्य नागरिक हे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी काही ना काही करतात. त्यामुळे भारतीय नागरिक व सैन्यदल हे एक कुटुंब आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात सैन्यदलातील जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी कर्नल वसंत बल्लेवार, मेजर मोहन बजाज, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, शिवा मंत्री आदी उपस्थित होते.
कर्नल वसंत बल्लेवार म्हणाले की, समाजातून मिळणारा सामान्यांचा पाठिंबा आणि सहकार्य यामुळे आम्हा सैनिकांचे मनोबल वाढते. तसेच देशासाठी लढण्याची क्षमता वाढते. भारताची सेना ही वेगळी आहे. कारण सामान्य भारतीय हे आमच्या पाठीशी आहेत.
प्रास्ताविकात प्रविण चोरबेले म्हणाले की, प्रत्येक जण सण आनंदाने साजरे करतो. त्यामागील कारण म्हणजे आपले सैनिक सीमेवर रक्षणार्थ उभे आहेत, त्यामुळे आपण हा आनंदोत्सव साजरा करू शकतो. भारतीय जवान सशक्त आहेत, त्यामुळे भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. त्यांच्या कुटुंबियांकडे आपण लक्ष देणे व त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. वीरमाता व वीरपत्नींनी देखील मनोगत व्यक्त केले.