

आपल्या देशाची जनगणना दर दहा वर्षांनी होते. त्या नियमानुसार ती 2021 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीमुळे ती 2025 पर्यंत होऊ शकली नाही. त्यामुळे आता ती 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दैनिक पुढारीने विविध स्त्रोतांच्या माहितीच्या आधारे देश आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, 2027 पर्यन्त नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील. देशाची लोकसंख्या सुमारे 14 ते 15 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. 2011 च्या तुलनेत लोकसंख्या सुमारे 121 कोटीवरून 148 कोटींवर जाईल.
गणितीय मॉडेलद्वारे लोकसंख्या शास्त्रज्ञांनी हा अंदाज काढला आहे.तसेच महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11 कोटी वरून सुमारे 12.8 ते 13 कोटी पुढे जाईल असाही अंदाज तज्ञांनी दिला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 2011 सालच्या जनगणनेत 121 कोटी ( 1.21अब्ज ) नोंदली गेली होती मात्र 2027 पर्यन्त त्यात 14 ते 15% वाढ होऊन ती सुमारे 148 कोटी (1.48 अब्ज ) पर्यंत वाढेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
येत्या काही दशकातच ती 170 कोटींवर जाईल. मात्र यानंतर लोकसंख्या वाढीच्या आलेखात घट होण्यास सुरुवात होईल असाही अंदाज आहे.2011 ते 2027 या 16 वर्षात भारत आणि महाराष्ट्रासाठी लोकसंख्याशास्त्रीय सामाजिक-आर्थिक अंदाजांचा आढावा विविध स्रोतांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.जो वयोगट आणि प्रमुख निर्देशकांद्वारे अंदाजे वर्तवला आहे.
2027 पर्यन्तभारताची लोकसंख्या अंदाजे 148कोटी 51 हजार 800(1.48 अब्ज) तर महाराष्ट्रची लोकसंख्या 13 कोटी 2 लाख 91 हजार 608 च्या जवळपास जाण्याचा अंदाज आहे. नव्या जनगणनेत जातीनिहाय वर्गवारीतून अधिक बाबी ठळकपणे समोर येतील ती देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरेल असे वाटते.
डॉ.विनी शिवनंदन, प्रभारी प्रमुख,लोकसंख्या संशोधन केंद्र,गोखले इन्स्टिट्यूट, पुणे