

पुणे: उन्हाळ्याची चाहूल लागली असून दैनंदिन दूध संकलनात सध्या किंचित घट येण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे दूध पावडरला मागणी वाढल्यामुळे शेतकर्यांकडून घेण्यात येणार्या दुधाच्या खरेदी दरात बहुतांशी सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांनी प्रतिलिटरला एक रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला आता 32 रुपये झाला असून 11 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती दुग्धव्यवसायाच्या वर्तुळातून दिली.
दूध पावडर आणि बटरची निर्यात सुरू असल्यामुळेही दुधाच्या खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे गायीच्या दूध खरेदी दरवाढीला पाठबळ मिळाल्याचे सांगण्यात आले. गायीच्या दुधाचे खरेदी दर लिटरला 31 रुपयांवर स्थिरावलेले होते.
मात्र, दुधाच्या पावडरला मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दूध पावडर उत्पादक आणि खासगी डेअर्यांकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. दुधाच्या खरेदी दरात वाढत्या स्पर्धेमुळे दूध संकलन टिकवून ठेवण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेही (कात्रज डेअरी) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला एक रुपयांनी वाढ केली आहे.
11 फेब्रुवारीपासून गायीच्या दुधाचा खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला 32 रुपये केला आहे. तशा परिपत्रकीय सूचना कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सर्व प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था, डेअरी फार्मच्या प्रतिनिधींना कळविल्या आहेत.
दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर 200 रुपयांपर्यंत तर बटरचा दर 350 ते 375 रुपयांपर्यंत स्थिर होता. आता दूध पावडरचा दर 220 ते 250 रुपये तर बटरचा दर 400 ते 420 रुपयांवर पोहचला आहे. कारण, दूध पावडर आणि बटरची निर्यात सुरू झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून दुधाच्या खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाली असून, खरेदी दरात वाढ केली आहे. मात्र, गायीच्या दूध विक्री दरात कोणतीही वाढ केलेली नाही.
- मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, कात्रज दूध संघ, पुणे