

पुणे: व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतासह जगभरातील वायदे बाजारात सोन्याला मागणी वाढली आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याने गत दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
देशांतर्गत ठेवींचे घटलेले दर यामुळे हमखास गुंतवणूक देणार्या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.10) शुद्ध सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 2 हजार 940 रुपयांनी वाढून 93,380 रुपयांवर गेले.
शुक्रवारी देखील 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 2 हजार 20 रुपयांनी वाढून 95,400 रुपयांवर गेला. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. सराफी बाजारात गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव
2 हजार 700 रुपयांनी वाढून 85 हजार 600 रुपयांवर गेला होता. त्यात शुक्रवारी पुन्हा 1,850 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 87,450 रुपयांवर गेला. चांदीचा एक किलोचा भाव 4 हजार रुपयांनी वाढून 97 हजार रुपयांवर गेला होता. शुक्रवारी चांदीचा प्रतिकिलो भाव शंभर रुपयांनी वाढून 97,100 रुपयांवर गेला.
अमेरिकेने छेडलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक व्यापारातील अनिश्चितता वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का कपात केली. फेब्रुवारी महिन्यातही आरबीआयने रेपो दरात पाव टक्का कपात केली होती.
सलग दोनदा रेपो दरात कपात केल्याने बँक ठेवींच्या व्याजदरात अर्धा टक्का कपात झाली आहे. परिणामी, चांगला परतावा देणार्या सोन्यामधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारातही सोन्याला चांगली मागणी आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क बाजारात एक औंस (28.34 ग्रॅम) सोन्याचा दर दोन टक्क्यांनी वाढून उच्चांकी 3,240 डॉलरवर गेला आहे.