

टेम्पो व दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाले. बेल्हे-जेजुरी महामार्गावर मंगरूळ येथील कुकडी नदीच्या वळणावर गुरुवारी (दि. 21) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रत्नाकर श्रीमंत गायकवाड (वय 36, रा. कोंढवा, पुणे), आरती राजू माने (रा. जुनी सांगवी, पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर व आरती हे दोघे पुण्यावरून शिर्डीला देवदर्शनासाठी दुचाकीवरून (एमएच 12 एसएस 9292) जात होते. मंगरूळ येथील कुकडी नदीच्या वळणावर समोरून येणार्या टेम्पोने (एमएच 15 डीके 5088) दुचाकीला धडक दिली. यामध्ये रत्नाकर व आरती हे दोघे चिरडले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आळेफाटा पोलिस दाखल झाले. पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.