बारामती: कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. 13) हायब्रीड ज्वारीची 212 क्विंटल आवक झाली. या वेळी झालेल्या लिलावात ज्वारीला क्विंटलला किमान 2050, कमाल 2500 आणि सरासरी 2400 रुपये दर मिळाला. गावरान ज्वारीची 141 क्विंटल आवक होऊन किमान 2411, कमाल 3211, सरासरी 2600 रुपये दर मिळाला.
या बाजार समितीत विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. येथे फळे, भाजीपाल्यासह मका, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा आदी भरडधान्यांची आवक होत आहे. बहुतांश भरडधान्यांचे दर स्थिर आहेत. बाजार समितीत तांबड्या मक्याची 174 क्विंटल आवक झाली.
मक्याला किमान 2051, कमाल 2300 आणि सरासरी 2250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. याशिवाय लोकवन गव्हाची 112 क्विंटल आवक झाली. लोकवन गव्हाला किमान 2300, कमाल 3050 आणि सरासरी 2900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या महिनाभरापासून गव्हाचे दर स्थिर आहेत. 2189 या गव्हाची 75 क्विंटल आवक झाली. या गावाला किमान 2600, कमाल 3300 आणि सरासरी 3100 असा दर मिळाला.
बाजार समितीमध्ये पुढील महिन्यापासून नवीन गहू आणि हरभरा उपलब्ध होणार असल्याने शेतकर्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. खडे गुळाला किमान 3525, कमाल 3650 आणि सरासरी 3600 रुपये दर मिळाला. हायब्रीड बाजरीची 116 क्विंटल आवक होऊन बाजरीला किमान 2100, कमाल 2751 आणि सरासरी 2600 रुपये दर मिळाला.
महकोबाजारची 78 क्विंटल आवक होऊन यासाठी किमान 2651, कमाल 3251 आणि सरासरी 2900 रुपये दर मिळाला. गरडा आणि जाडा हरभर्याला पाच हजारांपेक्षा जास्त दर मिळत आहे. मात्र, यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा शेतकर्यांना आहे. गूळ, बाजरी, हरभरा, उडीद, तूर, मूग, मका यांचीही आवक झाली.
पालेभाज्यांसह फळभाज्यांची विक्रमी आवक
जळोची उपबाजारात कोथिंबीर, मेथी, गवार, भेंडी, गाजर, मिरची, फ्लॉवर, दोडका, टोमॅटो, भोपळा, पावटा, राजमा, पुदिना, मुळा, हिरवी मिरची, वाटाणा, शेंग आदी भाज्यांची विक्रमी आवक होत आहे. भाज्यांना समाधानकारक दर मिळत आहे.

