वाल्हे: मागील काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा तसेच थंडीचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकरीवर्गाला बसला आहे. वातावरणातील बदलामुळे अंजीरफळाचा कडकपणा जाऊन, अंजीरफळाची साल सैल पडून अंजीर उकलत आहे. तसेच, अंजीरफळाची गोडी कमी होऊन अंजीर खराब निघत आहेत. यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे. यामुळे अंजीर उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून, ते आर्थिक संकटात सापडत आहेत.
ढगाळ हवामानामुळे अंजीरफळे उकलत असून, गोडी देखील कमी होत आहे. अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघत आहे. परिणामी, अंजीर उकलले गेल्याने बाजारभावात देखील कमालीची घसरण झाली आहे.
वाल्हे नजीक आडाचीवाडी (ता. पुरंदर) परिसरातील शेतकर्यांचे अंजीर हे प्रमुख पीक आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराच्या फळबागा आहेत. हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते.
यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने अगोदर पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या शेतकरीवर्गासमोर आता पुन्हा बदलत्या हवामानाचा परिणाम अंजिराच्या बाजारपेठेवर झाला आहे. हजारो रुपये खर्च करीन देखील कमी प्रमाणात आर्थिक उत्पन्न येत नसल्याने शेतकरीवर्गात असमाधानकारक वातावरण असल्याचे सूर्यकांत पवार, संभाजी पवार, आनंद पवार आदी उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
उत्पादनामध्ये 50 ते 60 टक्के घट
अंजिराच्या उत्पन्नामध्ये जवळपास 50 ते 60 टक्क्यांपेक्षा अधिक घट होत असून, अंजीर उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बागांवर झालेला खर्च देखील निघेनासा झाल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडून शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक संभाजी पवार, प्रशांत पवार, महेश पवार यांनी सांगितले.