

खेड तालुक्यातील आळंदी, मरकळ या भागांतून बहुप्रतीक्षित रिंगरोड जात असल्याने व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अगदी वेशीवरच हा भाग असल्याने येथील जमिनीत गुंतवणुकीला सोन्याचे भाव आले आहेत.
आळंदी शहराच्या चारही बाजूंच्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत जोर धरलेला प्लॉटिंग धंदा धडाक्यात सुरू आहे. यामध्ये मध्यमवर्गीयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला असला, तरी मोठ्या राजकीय दबावामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
साधारण 2014 मध्येच आळंदी, मरकळ, कुरुळी आदी भागांतून रिंगरोड जाणार असल्याची घोषणा झाली व नंतर भूसंपादन होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आळंदी शहरालगत गुंतवणूक करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड येथील गुंतवणूकदार व आजी-माजी नेत्यांनी जागेचा फायदा घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली. आळंदी शहरालगत व आळंदी मंडलाच्या कार्यक्षेत्रात येणार्या गावांमध्ये नैसर्गिक स्रोत असणारा ओढा मुरुम, माती, दगड टाकून प्रवाहांना अडथळा ठरतील असे बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या व धनदांडग्यांनी सुरू केला आहे. शेतजमिनींचे बेकायदा एक एका गुंठ्याचे प्लॉट पाडून विक्री होत आहे. यात महसूल विभागातील मंडळी देखील कायद्यातील पळवाटा शोधून अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. आळंदीलगत परिसरातील गावांच्या हद्दीत जमिनीचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे, संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनीवर विकास करणे अपेक्षित असते. मात्र, याला फाटा दिला जात आहे.
रेखांकित जमिनीत मोकळा ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे, दिवाबत्तीची व्यवस्था, जलनिस्सारण गटारांची व्यवस्था, आवश्यक रस्ते व संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकनधारकाची असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या बाबी समोर येत आहेत.
आळंदी भागातील प्लॉटिंग दलालांनी प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून ओढ्यालगत जमीन, डोंगर, टेकड्या, वादावादी व वतनी, इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे. अशिक्षित व गोरगरीब शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून तो प्लॉट चौपट, पाचपट दराने बेकायदेशीरपणे विक्री केला जात आहे आणि या दलालांना महसूल विभागातील मंडळी देखील लालसेपोटी कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत.
आळंदी मंडल कार्यक्षेत्रात येणार्या आळंदी ग्रामीण, केळगाव, चर्होली खुर्द, मरकळ, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, गोलेगाव, वडगाव-पिंपळगाव, कोयाळी आदी गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदा प्लॉटिंग करून ग्राहकांना आकर्षित करत त्याची विक्री केली जात आहे.