

कोथरूड: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, भूगावकडून बावधनकडे जाणार्या पुलावरील रस्त्याच्या वळणावर तसेच पुलावर खासगी वाहनांचे अवैध पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.
या ठिकाणी सध्या सर्रास वाहने उभी केल्याचे चित्र दिसून येत आहे. चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गेल्या काळात प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला.
यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. परंतु, पुलावर तसेच भूगावकडून बावधनकडे जाणार्या रस्त्याच्या वळणावर बेशिस्तपणे खासगी वाहनांचे पार्किंग केले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुलावर वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीसाठी रस्त्याची रुंदी कमी होत आहे. परिणामी, अरुंद रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने दिसत नसल्याने किरकोळ अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल वेडेपाटील म्हणाले की, बावधनकडे जाणार्या वळणावर तसेच पुलावरही वाहनांचे अनधिकृत पार्किंग होत असून, हे धोकादायक आहे. चांदणी चौक पुलाची हद्द ही पिंपरी पोलिस आयुक्तालय आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याने याबाबत तक्रार नेमकी कुठे करावी? असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु, पोलिस प्रशासनाने परिसरातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे आवश्यक आहे; अन्यथा गंभीर अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
चांदणी चौक परिसरात असलेल्या हॉटेल आणि कॅफेमध्ये येणारे तसेच पुलावर गप्पा मारत थांबणारे युवक आणि नागरिक या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करत आहेत. वळणावर वाहने उभी केली जात असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. पोलिस प्रशासनाने याची खबरदारी घेऊन परिसरातील अनधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
- रमेश उभे, सामाजिक कार्यकर्ते
चांदणी चौकातील अवैध पार्किंगवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
- विजय वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन वाहतूक विभाग