Bavankule : मला उद्धव ठाकरेंची दया येते : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आमदार जास्त असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद, हेच आमचे सूत्र
Chandrashekhar Bawankule to criticize on Uddhav Thackeray
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीPudhari Photo
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसच्या द़ृष्टीने उद्धव ठाकरेंची गरज आता संपली आहे. त्यांच्या मागे मागे धावणार्‍या उद्धव ठाकरेंची मला दया येते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. महायुतीमध्ये जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून कोणतेही मतभेद किंवा चढाओढ नाही. ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे आमचे सूत्र आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यातील एका हॉटेलमध्ये शहरातील इच्छुकांची बैठक घेतली. या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपपासून तोडणे हाच शरद पवारांचा एकमेव उद्देश होता. ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शरद पवार व काँग्रेसच्या द़ृष्टीने ठाकरे यांची उपयुक्तता संपली आहे. आम्ही ठाकरेंशी चर्चा करायला मातोश्रीवर जात होतो, ते म्हणतील तसे करत होतो, पण आता ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) मागे धावावे लागते. त्यांची आम्हाला दया येते. महायुती सरकारने लाडकी बहीणसह जनतेच्या कल्याणासाठी आणलेल्या सर्व योजना आम्ही बंद करू, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. त्यामुळे जनता योग्य तो निर्णय घेईल, असेही बावनकुळे म्हणाले.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी परिस्थिती असून, मुख्यमंत्रिपदासाठीच ते आपापसात लढत आहेत. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची मागणी करताहेत. नाना पटोले प्रत्येक सभेत मीच मुख्यमंत्री, असा दावा करत आहेत. विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातदेखील मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत.

महायुतीचे तिन्ही नेते दूरदृष्टी असलेले व प्रशासनाचा अनुभव असलेले आहेत. त्यांच्यात कोणतीही चढाओढ नाही. मात्र, 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी मोदी सरकारसोबत राज्यात महायुती सरकार असे डबल इंजिन असावे, यासाठी आम्ही एकदिलाने प्रयत्न करत आहोत.

आमच्या संसदीय मंडळाची बैठक काल झाली. उमेदवारी कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी संसदीय मंडळाचाच आहे. त्यामुळे उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल, पण केव्हा हे मी सांगू शकत नाही. ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम सर्वजण करतील. जातपात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडी करते. आम्ही गुणवत्ता आणि निवडून येण्याच्या निकषांवर उमेदवारी देतो. महायुतीत आता ‘नंबर गेम’ राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही जागावाटपात अडलेलो नाही. जिथे मित्रपक्षातला उमेदवार जिंकू शकतो, तिथे तडजोड करू. महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे बावनकुळे म्हणाले.

महामंडळांवरील नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. प्रशासकीय आदेश नंतर निघू शकतात. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याने कोणी त्यावर आक्षेप घेऊ नये, असेही बावनकुळे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news