

भामा आसखेड: मी कुस्ती हरलो नाही, पंचांनी अतिशय चुकीचा निर्णय दिला, त्यांचा तो निर्णय मला अजिबात मान्य नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने माझ्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पंचांचा चुकीचा निर्णय आणि कुस्तीगीर संघाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांनी सांगितले.
अहिल्यानगर येथील 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागाच्या उपांत्य फेरीत डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या लढतीत शिवराजची पाठ टेकली नसताना पंचांनी मोहोळ विजयी झाल्याचे घोषित केले.
मी कुस्ती हरलो नाही, असे म्हणत शिवराजने तिसरे पंच आणि व्हिडीओ पाहून निर्णय घेण्याची मागणी केली. परंतु, कुस्तीगीर संघाच्या पदाधिकार्यांनी माझी मागणी अमान्य केली. उलट पंच मला अर्वाच्य भाषेत बोलले, असा आरोप पै. शिवराजने राक्षेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
कुस्ती स्पर्धेनंतर पै. शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडी या आपल्या गावी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होता. तो पुढे म्हणाला, पंचांनी अतिशय चुकीचा निर्णय दिला. गलिच्छ भाषेत बोलले आणि आम्ही केलेली मागणी धुडकावल्याने राग अनावर झाला. त्यामुळे मी टोकाचे पाऊल उचलून पंचांची कॉलर पकडली व लाथ मारली.
मला पंचांचा निर्णय अजिबात मान्य नाही. अशा निर्णयाने खेळाडूंनी केलेली अनेक वर्षांची तपचर्या भंग पावते आणि चुकीच्या निर्णयामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान होते. दाद मागितल्यानंतर व्हिडीओ पाहून निर्णय घेतला असता तर मला मान्य आहे.
परंतु, मी मागितलेली वारंवारची दाद कुस्तीगीर संघाच्या उपस्थित पदाधिकार्यांनी अमान्य केली. मी कुस्ती स्पर्धेत हरलो नाही, तर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मी कुस्ती हरलो, असा आरोप पै. शिवराजने पुन्हा केला.
कुस्तीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही कुस्ती संघाला व्हिडीओ दाखवा, असे सांगितले. पण, दाखविले गेले नाही. पंचांनी निर्णय घोषित केल्यानंतर कुस्तीगीर संघाच्या पदाधिकार्यांनी कुस्तीचा व्हिडीओ पहिला असता पंचांची चूक झाली, असे नंतर सांगितले.
पंच कुठले आहेत, ते मला माहीत नाही. अगोदर संदीप भोंडवे म्हणाले, पंचांचा निर्णय योग्य आणि नंतर म्हणतात पंचांचा निर्णय चुकीचा आहे. अशी दुटप्पी भूमिका कशासाठी? चूक झालीच नाही, तर आम्ही हार कशी मानायची? पंचांनी चुकीचा निर्णय दिला नाही पाहिजे, असे सवाल शिवराजने उपस्थित केले.
या वेळी पै. शिवराज राक्षेचे प्रशिक्षक रणधीरसिंग पोंगा, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, सरपंच सविता राक्षे, शिवराजच्या आई व माजी सरपंच सुरेखा राक्षे, वडील पै. काळुराम राक्षे, युवराज राक्षे, गावचे पोलिस पाटील पप्पूकाका राक्षे, पांडुरंग राक्षे, गिरिजाधर राक्षे हे उपस्थित होते.