पुणे: पारंपरिक वेशभूषेत पाणी बचतीचा संदेश देणार्या महिला... बुलेटवर स्वार झालेल्या महिलांचा रॅलीत दिसलेला जोश अन् आत्मविश्वास... महिलांचे शिस्तबद्ध बाईक रायडिंग आणि स्त्रीशक्तीचा नारा बुलंद करणार्या महिला... असे जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरण दै. ’पुढारी’ माध्यम समूह आयोजित आणि दै. ’पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीत रविवारी (दि. 23) पाहायला मिळाले.
दुचाकीवर स्वार झालेल्या महिला - युवतींनी रॅलीतून पुणेकरांचे लक्ष वेधले अन् पाणी हेच जीवन, जल है तो कल है... असे विविध संदेश देत शेकडो महिलांनी पाणी बचतीचा, पाण्याच्या वापरासंदर्भातील महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृतीही केली. प्रत्येकीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता अन् महिला -युवतींनी रॅलीतून ’हम किसी से कम नही’ हे दाखवून दिले.
दै. पुढारी माध्यम समूह आयोजित आणि दै. पुढारी कस्तुरी क्लबतर्फे गुढी पाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने महिलांच्या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीचे यंदाचे तिसरे वर्ष होते. या बाईक रॅलीचा आवाज सगळीकडे पाहायला मिळाला. प्रत्येक महिलेने बांधलेला फेटा, जिन्स - पांढरा कुर्ता या वेशभूषेने लक्ष वेधले.
रॅलीत एकीकडे पारंपरिकतेचा साज आणि दुसरीकडे आधुनिकतेची कास असे चित्रही या वेळी पाहायला मिळाले. पुण्यातील श्री भैरवनाथ हलगी ग्रुपच्या कलाकारांनी केलेल्या हलगी वादनाने रॅलीत रंग भरले. तर दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या महिला सदस्यांनी केलेल्या शंखनादाने वातावरणात चैतन्य निर्माण केले.
दैनिक ’पुढारी कस्तुरी क्लब’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी महिलांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत महिलांशी संवाद साधला. डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जाधव यांच्या हस्ते ’फ्लॅग ऑफ’ करून रॅलीला सुरुवात झाली.
सन मराठी वाहिनीवरील ’तुझी माझी जोडी जमली’ या मालिकेत प्रमुख भूमिका करणारे संचित चौधरी आणि अस्मिता देशमुख, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाच्या शिल्पा हरिहर आणि सहकारी, ’स्मिता एक्सपोर्टस’च्या संचालिका स्मिता समीर पाटील, लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लिमिटेडच्या व्यवस्थापक नंदा बंगाळे, ’एआयएसएसएमएस’च्या मार्केटिंग हेड साशा शेळके, ’एथेक्स हॉलीडेज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री गटणे, ’कलांजली सिल्क अॅण्ड सारीज’चे संचालक मोहन यमजाल आणि लावण्या यमजाल, हे प्रायोजकही रॅलीत सहभागी झाले.
रॅलीला सकाळी साडेआठ वाजता सारसबागेजवळील मित्रमंडळ चौक येथील दै. ’पुढारी’च्या कार्यालयापासून सुरुवात झाली. रॅलीच्या सुरुवातीला दामिनी पथकाच्या अधिकारी आणि महिला पोलिस सहभागी झाल्या. त्यांनी मोठ्या जोशात बाईक रॅलीत सहभाग नोंदवित रॅलीला मार्गदर्शन केले. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने महिलांनी दुचाकी चालवत आणि घोषणा देत स्त्रीशक्तीचा नारा बुलंद केला. या रॅलीला पुणे पोलिस, दामिनी मार्शल्स, हरजीवन हॉस्पिटलचे डॉ. सागर रोकडे पाटील आणि त्यांचे सहकारी डॉक्टर, पुणे महानगरपालिका, पुणे वाहतूक पोलिस यांनी सहकार्य केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड हे रॅलीचे फायनान्स पार्टनर होते. सन मराठी चॅनेल हे रॅलीचे एंटरटेन्मेंट पार्टनर होते. तर अमेय गटणे, गायत्री गटणे यांचे एथेक्स हॉलीडेज हे ट्रॅव्हल पार्टनर होते. मोहन यमजाल यांचे कलांजली सिल्क अॅण्ड सारीज हे गिफ्ट पार्टनर होते. आनंदी बुटीकतर्फे रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. रॅलीच्या समारोपाला झालेल्या कार्यक्रमात रॅलीत वैविध्यपूर्ण पेहराव केलेल्या ’पुढारी’ कस्तुरी क्लब सदस्यांना गौरविण्यात आले.
या मार्गावरून पार पडली रॅली--
’पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, सारसबाग चौक, पुरम चौक, बाजीराव रस्त्याने महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, नवा पूल, स. गो. बर्वे चौक, डावीकडे जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लालबहादूर शास्त्री रस्ता, दांडेकर पूल चौक, डावीकडे महालक्ष्मी मंदिर चौक, उजवीकडे मित्रमंडळ चौक या मार्गाने रॅलीची सकाळी साडेनऊ वाजता दैनिक ’पुढारी’ कार्यालयाजवळ सांगता झाली.
’जल है तो कल है’चा घुमला नारा!
’जागतिक जल दिना’निमित्त महिलांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचे संवर्धन करा, भविष्य सुरक्षित करा असे संदेश दिले. तसेच, योगायोगाने रविवारी (दि.23) जागतिक हवामान दिनदेखील होता, त्यामुळे महिलांनी निसर्ग, जल, पर्यावरण आणि हवामान यावर घोषवाक्ये तयार करून ती रॅलीत आणली होती. पाणी हेच जीवन, पर्यावरण स्वच्छ ठेवा, पाण्याचे महत्त्व ओळखा, जल है तो कल है, सेव्ह वॉटर, सेव्ह लाइफ... असे विविध संदेश असलेल्या फलकांमधून महिलांनी रॅलीच्या मार्गांवर पाणी बचत, पाण्याच्या वापरासंदर्भात जनजागृती केली.
महिलांच्या बाईक रॅलीने पुणेकरांचेही वेधले लक्ष
शेकडो महिलांना दुचाकी चालवताना पाहून पुणेकरही आश्चर्यचकित झाले. बुलेटवर स्वार झालेल्या महिलांची छबी अनेकांनी मोबाईल कॅमेर्यात कैद केली, तर अनेक मार्गांवर रॅलीचे पुणेकरांनी हात उंचावत स्वागत केले. महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास काही औरच होता. बाजीराव रस्ता असो वा जंगली महाराज रस्ता... सगळीकडे रॅलीचे जोरदार स्वागत झाले आणि पुणेकरांनीही महिलांच्या जिद्दीला सलाम केला.
काही महिलांनी रॅलीदरम्यान सेल्फी आणि छायाचित्रे क्लिक केली, तर काहींनी व्हिडिओही बनवले. ही बाईक रॅली शहरातील प्रत्येक चौकातून जात होती. चौकात रॅलीचे आगमन होताच पुणेकर नागरिक स्वतःहून आपले वाहन थांबवत होते आणि चौकातून रॅली पुढे मार्गस्थ होत असताना मोठ्याने घोषणा देत महिलांना प्रोत्साहन देत होते.
दै.’पुढारी’च्या बाईक रॅलीला महिला आरटीओ अधिकार्यांचीही उपस्थिती...
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दैनिक ’पुढारी’ला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वतीने ’आरटीओ’च्या प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जाधव या बाईक रॅलीत रविवारी सहभागी झाल्या. यंदा प्रथमच रॅलीमध्ये आरटीओच्या वतीने सहभाग नोंदवण्यात आला. अश्विनी जाधव यांनी ’पुढारी’च्या या उपक्रमाचे कौतुक करत, महिलांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे या वेळी सांगितले.
हलगीच्या तालावर धरला ठेका--
हलगीच्या तालावर ठेका धरत महिलांनी मोठ्या उत्साहात बाईक रॅलीमध्ये सहभागी नोंदविला. हलगीवादकांनी ठेका ठरताच महिलांनी हात उंचावत एकमेकांना प्रोत्साहन देत त्या नाचताना दिसून आल्या. या वेळी प्रत्येक जण एकमेकींचा उत्साह वाढवीत होत्या. तर, अन्य महिलांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
पारंपरिकतेपासून आधुनिकतेपर्यंत पेहराव....
महिला बाईक रॅलीमध्ये पारंपरिक नऊवारीपासून ते आधुनिक पेहराव करत महिलाही सहभागी झाल्या होत्या. याखेरीज, विविध राज्यांतील पेहराव केलेल्या महिलांनी अधिक लक्ष वेधले. पेहरावावर टोपी, फेटे, फुलांची माळ आदी गोष्टी महिलांच्या सौंदर्यात भर टाकत होत्या. तर, नवनवीन केशरचना करत रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांची चर्चाही बरीच रंगली होती. काही महिलांनी हवाई गर्ल्स असे अनोखे पेहरावही केले होते. रॅलीमध्ये दिव्यांग महिलांनीही सहभाग घेत आपली चमक दाखवली. देवीची विविध रूपेही महिलांनी साकारल्या होत्या.
मोपेड, बुलेट मोस्ट फेव्हरेट
रॅलीमध्ये बहुतांश महिला मोपेड दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. तर काहींनी बुलेटवरून रॅलीमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य दिले. या वेळी गाडीवर काहींनी गुढी उभारली तर काहींनी पाण्याचे संदेश देणारे फलक झळकावीत सामाजिक संदेश देण्यावर भर दिला. तर, काहींनी गाड्यांना आकर्षक सजावट करण्यास प्राधान्य दिले होते.
शिस्तबद्ध रॅलीने शहर झाले रोमांचित
दै. ’पुढारी’ कार्यालयापासून साडेआठ वाजता बाईक रॅली निघाली, त्या वेळी रस्त्यावरील लोकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे रॅलीचे स्वागत करीत रस्ता मोकळा करून दिला. विविध ठिकाणी चौकात पीएमपीच्या बस थांबल्या, त्यांनी रॅलीला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली. रॅलीने शहरातील वातावरण रोमांचित केले.
अन् पोलिस महिलेने काढले छायाचित्र...
महिलांच्या बाईक रॅलीदरम्यान महिलांचा उत्साह जास्त होता. अनेक चौकात पोलिसांनी वाहतूक रोखून ठेवली होती. दोन चौकांमध्ये रॅलीचे आगमन होताच महिला वाहतूक पोलिसाने वाहतूक नियंत्रण करता करता या रॅलीचे दृश्य पाहून आपल्या खिशातील मोबाईल काढत या रॅलीची क्षणचित्रे टिपली.
कलाकारांशी साधला मनमोकळा संवाद...
सन मराठी वाहिनीवरील ’तुझी माझी जोडी जमली’ या मालिकेत प्रमुख भूमिका करणारे संचित चौधरी आणि अस्मिता देशमुख यांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधला अन् बाईक रॅलीतही सहभाग घेतला. अस्मिता देशमुख यांनी दुचाकी चालवली आणि त्यांच्या मागे संचित चौधरी बसले होते. या दोन्ही कलाकारांनीही महिलांसोबत रॅलीत सहभागी होत जल्लोष केला. महिलांनी कलाकारांसोबत सेल्फी आणि छायाचित्रेही घेतली. तर कलाकारांनी महिलांच्या कर्तृत्वाला दाद दिली.