आकाशकंदिलाचा प्रकाश, दिवे- पणत्यांची रोषणाई, फराळाचा आस्वाद आणि प्रथेप्रमाणे गाय-वासराचे पूजन अशा आनंदी वातावरणात सोमवारी वसुबारस घरोघरी साजरी होणार आहे. त्याबरोबरच दीपावलीच्या आनंद पर्वालाही सुरुवात होणार आहे. घरोघरी आणि मंदिरांमध्ये दीपावलीची जोरदार तयारी सुरू आहे. वसुबारसनिमित्त सगळीकडे चैतन्याची पालवी फुलली आहे. मठ - मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवा आनंद, नवा जोश आणि नवी ऊर्जा घेऊन वसुबारस साजरी केली जाणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने आकाशकंदील आणि नक्षीदार रांगोळीही अंगणात काढण्यात येणार आहेत.
वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाय-वासराचे पूजन करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे गाईंसाठीच्या गोठ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक संस्थांसह संघटनांनी त्यांच्या त्यांच्या भागात गाय आणि वासरांच्या पूजनासाठीची व्यवस्था केली आहे. तसेच गाय-वासराच्या मूर्तीची अथवा प्रतिमेची पूजा घरोघरी करण्यात येणार आहे. विविध गोशाळांमध्ये जाऊन स्त्रिया पूजन करणार आहेत. सायंकाळी घरांमध्ये, मंदिरांमध्ये दिवे, पणत्या लावण्यात येतील आणि यानिमित्ताने घरोघरी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदण्याची प्रार्थना करण्यात येईल. मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना मंदिरांत दिवसभर दर्शन घेता येणार आहे.