

पुणे : जोशी रुग्णालय आणि रत्ना मेमोरियल हॉस्पिटल ही दोन्ही रुग्णालये धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत येतात. दोन्ही रुग्णालयांनी योजना बंद करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला आहे. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच दोन्ही रुग्णालयांनी ‘आमच्याकडे धर्मादाय योजना बंद झाली आहे,’ असे म्हणत हात वर केले आहेत. दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत हे चित्र समोर आले आहे.
सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल रुग्णालयामध्ये प्रतिनिधीने धर्मादाय योजनेबद्दल विचारणा केली. योजनेच्या विचारणेसाठी रिसेप्शन काऊंटरवरुन बिलिंग विभागात पाठवण्यात आले. ‘वडिलांचे गुडघ्याचे ऑपरेशन करायचे असून, त्यांची आर्थिक फारशी चांगली नाही. धर्मादाय योजनेअंतर्गत त्यांच्यावर उपचार होऊ शकतील का?’ असे विचारले. यावेळी ‘आमच्याकडे पूर्वी योजना होती; मात्र आता आमचे हॉस्पिटल खासगी असून, योजना बंद झाली आहे,’ असे उत्तर देण्यात आले.
स्थळ ः जोशी रुग्णालय,
कमला नेहरू पार्क, शिवाजीनगर
प्रतिनिधी ः माझ्या आईला हृदयाची बायपास शस्त्रक्रिया सांगितली आहे. इथे धर्मादाय सुविधा आहे का?
सुरक्षा रक्षकः नाही हो.. इथे धर्मादाय सुविधा नाही.
प्रतिनिधीः मग आम्ही कुठे जायचे ते सांगा..
सुरक्षा रक्षकः दीनानाथमध्ये जा की, तेथे आहे सुविधा!
प्रतिनिधीः अहो, पण तुमच्याकडे सुविधा आहे का नाही हे नक्की कोण सांगेल..
सुरक्षा रक्षक (वैतागून)ः आत जाऊन
प्रथम रिसेप्शन काउंटरवर जा आणि
तेथील मॅडमना विचारा..
प्रतिनिधी (स्वागत कक्षात जातात )ः माझ्या आईला बायपास सर्जरी सांगितली आहे. आम्ही गरीब आहोत. धर्मादायमध्ये ऑपरेशन करायचे आहे. काय करावे लागेल?
महिला कर्मचारी : नाही. आमचे रुग्णालय धर्मादाय सुविधेत येत नाही. तुम्ही दुसरीकडे जा.
प्रतिनिधी : गरिबांसाठी कोणतीच सुविधा नाही का तुमच्याकडे?
महिला कर्मचारी: आहे ना. पुणे महापालिका कर्मचारीवर्गासाठी 50 टक्केपर्यंत सूट आहे. पण, त्यासाठी कार्ड काढावे लागते.
आमचे रुग्णालय धर्मादाय योजनेअंतर्गत येत नाही. शासनाच्या यादीत रुग्णालय धर्मादाय असल्याचे दाखवले आहे. मात्र, आता ते धर्मादायमध्ये येत नाही. आम्ही धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे तसा अर्ज केला आहे. कायदेशीर पद्धतीप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यादीतून नाव जाईल. आम्ही धर्मादाय योजना नको म्हणून अर्ज केला आहे.
चैत्राली कुलकर्णी, संचालक, जोशी रुग्णालय