दीपक जाधव
सुपे: बारामतीतील सुपे येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर जुन्या हेमाडपंती धाटणीचे स्वयंभू असे पूर्वाभिमुख मंदिर आहे. येथील भाविकांचे जागृत असे श्रद्धास्थान आहे. श्रावणात महिनाभर येथे काकड आरती, दर सोमवारी प्रवचन आणि महाआरतीचा कार्यक्रम होत असतो.
येथील मंदिराच्या शिलालेखावरून सुमारे 294 वर्षांचे हे पुरातन मंदिर आहे, हे समजते. येथील मंदिर म्हणजे एक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या मंदिरात वर्षातून दोनदा सूर्यनारायणाची किरणे स्वयंभू पिंडीवर पडून महाअभिषेक घडतो. (Latest Pune News)
येथे प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर चार टप्प्यांत मंदिराची रचना विभागली गेली आहे. प्रथम श्री नंदिकेश्वराचे दर्शन होते. या परिसरातील ही भव्य कोरीव मूर्ती आहे. त्यानंतर भजनमंडप, पुढे दर्शनमंडप व नंतर मुख्य गाभारा आहे. येथे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. येथील मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर जुनी तीर्थाची विहीर आहे.
येथे आत उतरण्यासाठी दगडी पायर्या आहेत. या विहिरीच्या दक्षिण बाजूला एक भुयार आहे. या मंदिराच्या मुख्य गाभार्याजवळील दरवाजावर मराठीतील शिलालेखात शके 1642 शर्वरी संवत्सर दामाजी माणकेश्वर देशपांडे यांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. येथे दररोज नित्य पूजा, श्रावण महिण्यात दररोज काकड आरती तसेच महाशिवरात्रीला महासिद्ध उत्सवाचे आयोजन येथील ट्रस्टच्या वतीने करण्यात येते.
महाशिवरात्रीला सिद्धेश्वरास सामुदायिक मंगलस्नान
महाशिवरात्रीच्या दिवशी येथील सिद्धेश्वरास सामुदायिक मंगलस्नान घालण्यात येते. तसेच रात्री ओम नम: शिवाय या मंत्रोच्चाराने श्री सिद्धेश्वरास एक हजार एक बिल्वपत्र, सामुदायिक महाभिषेक घातला जातो. ही पर्वणी साधण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या भक्तीतून निर्माण होणार्या अनोख्या शक्तीची अनुभूती अनेक भाविक घेत असतात.