पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत इतिहास संशोधक मंडळात रविवारी पाक्षिक सभा संपन्न झाली. यात मुघल बादशाह औरंगजेबाच्या दरबारातील अधिकृत कागदपत्रांतील 'जवाबित-ए-आलमगिरी' या अप्रकाशित साधनातील औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या निर्घृण व नृशंस छळाचा आणि हत्येचा अप्रकाशित पुरावा सादर करण्यात आला. सदर दस्तऐवज प्रसिद्ध फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या ग्रंथालयात आढळून आला. तो त्यांनी मंडळातील विद्यार्थ्यांकडे सुपूर्त केला. या दस्त
ऐवजावरील संशोधन मंडळातील फारसी भाषेचे अभ्यासक सत्येन वेलणकर, पराग पिंपळखरे, रोहित सहस्रबुद्धे, मनोज दाणी, प्रशांत सोमण, अभिजित मोहिरे व गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले.
ते प्रातिनिधिक स्वरूपात पराग पिंपळखरे यांनी सभेमध्ये मांडले. त्यासंदर्भात श्रोत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांच्यासोबत गुरुप्रसाद कानिटकर, सत्येन वेलणकर यांनी समर्पक उत्तरे दिली. यासाठी फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. मंडळाचे चिटणीस व इतिहासकार पांडुरंग बलकवडे म्हणाले की, इतिहास संशोधनामध्ये विरुद्ध बाजूच्या पुराव्यांनाही तितकेच महत्त्व असते. हा पुरावा प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील सरकारी कामकाजातील कागदपत्रांचा असल्यामुळे त्याच्या सत्यतेबद्दल शंका घेण्यास वाव नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दिलेल्या कोणत्याही प्रलोभनांना न जुमानता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला तसेच स्वराज्याच्या आणि हिंदू धर्माच्या रक्षणार्थ बलिदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे. बलकवडे यांनीही मंडळातील सर्व अभ्यासकांचे कौतुक केले. हा दस्तावेज पूर्णपणे उपलब्ध करून पुस्तकरूपाने प्रकाशित करू, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
हेही वाचा