कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर; राज्यात हिंगणघाट बाजार समिती प्रथम

कारंजा लाड दुसरी, तर बारामती बाजार समितीचा तिसरा क्रमांक
Pune News
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर; राज्यात हिंगणघाट बाजार समिती प्रथम File Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक वर्ष 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे क्रमवारी (रँकिंग) जाहीर झाली आहे. त्यानुसार 305 बाजार समित्यांपैकी हिंगणघाट (वर्धा) बाजार समिती पहिल्या क्रमांकावर असून, कारंजा-लाड (वाशिम) दुसर्‍या आणि बारामती (पुणे) बाजार समिती तिसर्‍या क्रमांकावर असल्याची माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी दिली. क्रमवारीच्या माहितीचा उपयोग पणन व्यवस्थेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होऊ शकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, 68 खासगी बाजारांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील कॉटनसिटी अ‍ॅग्रो फुड्स प्रा. लि., भोयर हा खासगी बाजार पहिल्या क्रमांकावर आहे. याच जिल्ह्यातील किसान मार्केट यार्ड, शेलू बुद्रुक (ता. पुसद) हा खासगी बाजार दुसर्‍या क्रमांकावर, तर नाशिक जिल्ह्यातील परफेक्ट कृषी मार्केट यार्ड प्रा. लि., नांदूर हा खासगी बाजार तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील 305 बाजार समित्यांची व 68 खासगी बाजारांची क्रमवारी मागील दोन वर्षांपासून जाहीर करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने स्मार्ट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची आणि खासगी बाजारांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना-उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार वार्षिक क्रमवारीसाठी 35 निकष आणि 200 गुण निश्चित केले आहेत. खासगी बाजारांसाठी 40 निकषांसाठी 250 गुण निश्चित केले आहेत.

या निकषांशी संबंधित माहिती तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून गुण दिले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्यांची तसेच खासगी बाजारांची सन 2023-24 या वर्षाची क्रमवारी निश्चित केली आहे.

बाजार समित्यांची आणि खासगी बाजारांची वार्षिक क्रमवारी जाहीर झाल्यामुळे आपण शेतमाल विक्रीसाठी नेत असलेल्या बाजार समित्यांचे किंवा खासगी बाजारांचे स्थान हे इतर बाजार समित्यांच्या किंवा खासगी बाजारांच्या तुलनेत कोठे आहे, हे शेतकर्‍यांना समजणार आहे.

तसेच, यामुळे शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समित्यांमध्ये तसेच खासगी बाजारांमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. बाजार समितीचा विकास करताना नेमक्या कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे आहे, बाजार घटकांचे कोणते प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, याची स्पष्टता क्रमवारीनुसार बाजार समित्यांच्या संचालक मंडळास येणार आहे.

पहिल्या 10 मध्ये मुंबई, पुणे बाजार समिती नाहीच

राज्यात आर्थिक उलाढालीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेली मुंबई आणि दुसर्‍या क्रमांकावरील पुणे बाजार समितीला पहिल्या दहा समित्यांमध्ये स्थान मिळालेले नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या 10 बाजार समित्या व त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे- हिंगणघाट- वर्धा 178, कारंजा लाड 171.5, बारामती 165, लासलगाव (नाशिक) 157.5, पंढरपूर (सोलापूर) 155.5, चांदूर बाजार (अमरावती) 155.5, अकोला (अकोला) 154.5, उमरेड (नागपूर) 152.5, अकलूज (सोलापूर) 149, मंगरुळपीर (वाशिम) 149, लातूर (लातूर) 148.5, संगमनेर (अहिल्यानगर) 148.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news