

Baramati Politics: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी (दि. 18) थंडावतील. तत्पूर्वी सोमवारी बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गट व शरदचंद्र पवार गटाकडून सांगता सभांचे आयोजन केले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे बारामतीतील या सभांनी प्रचाराची सांगता करतील. या दोन्ही सभा लोकसभेप्रमाणेच हाय व्होल्टेज होतील, अशी चिन्हे आहेत.
महायुतीचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचाराची सांगता येथील मिशन हायस्कूल मैदानावर होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणात आल्यापासून त्यांची प्रत्येक निवडणुकीची सांगता सभा याच मैदानावर पार पडत होती.
परंतु पक्षफुटीनंतर लोकसभेला घरातच लढत झाली. त्या वेळी अजित पवार यांच्या पक्षाने हे मैदान अगोदरच बुक केले. परिणामी, शरद पवार गटाने मोरगाव रस्त्यावरील लेंडी पट्टा येथील मैदानात सांगता सभा घेतली. यंदा विधानसभेलाही महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा शरद पवार हे लेंडीपट्टा येथील मैदानातच घेणार आहेत.
अजित पवार यांच्या पक्षाकडून दुपारी 3 वाजता, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून दुपारी 2 वाजता सांगता सभेचे आयोजन केले आहे. या दोन्ही सभांमुळे बारामतीत सोमवारी रेकॉर्ड ब्रक गर्दी होईल अशी चिन्हे आहेत. गावागावातून, शहराच्या विविध भागांतून रॅलीने, वाजतगाजत कार्यकर्ते सभास्थळी दाखल होतील. त्यातून पोलिस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.