पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेळ – सायंकाळी सात वाजताची. स्थळ – फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या मुद्रणालयाजवळील गल्ली.
चार तरुणी एकत्र येऊन सिगारेट ओढत होत्या… त्यांच्या शेजारून जाणार्या लोकांना सिगारेटच्या धुराचा त्रास सहन करावा लागत होता… एक सिगारेट झाल्यानंतर दुसरी, मग तिसरी… असे करत अर्ध्या तासात किमान प्रत्येक तरुणीने तीन सिगारेट ओढल्या अन् त्या गाडीवर बसून निघून गेल्या…
आज या तरुणींप्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, कॅम्प, डेक्कन परिसर आदी ठिकाणी 20 ते 35 वयोगटातील तरुणी सर्रासपणे धूम्रपान करत असल्याचे पाहायला मिळते. त्यात महाविद्यालयीन तरुणींची संख्या मोठी असून दैनिक पुढारीने केलेल्या पाहणीत हे चित्र दिसून आले. आपल्या ग्रुपमधील तरुणींच्या व्यसनाबद्दल काही तरुणींशी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने संवाद साधला, त्यात ग्रुपमधील तरुणींनी आपले अनुभव सांगितले. ग्रुपमधील तरुणी गांजा आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचे या तरुणींनी नमूद केले.
दारू आणि सिगारेट सेवन करणे सोडावे आणि निरोगी आयुष्य जगावे, आवाहनही या तरुणींनी केले आहे. अमिता (नाव बदलले आहे) म्हणाली, मी फर्ग्युसन रस्त्यावरील एका महाविद्यालयात कला शाखेच्या दुसर्या वर्षात शिकते. माझ्या ग्रुपमध्ये चार ते पाच तरुणी असून, त्यातील तीन जणी धूम्रपान करतात, काही जणी दारू पितात. कित्येकदा त्यांना थांबवले
तरीही त्या ऐकत नाहीत. आताच्या घडीला अशा कित्येक जणी आहेत ज्या व्यसनांच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यांना यापासून दूर नेणे गरजेचे आहे. त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
सोनाली (नाव बदलले आहे) हिने सांगितले की, मी ग्राफिक डिझायनर आहे. माझ्या ओळखीतील कित्येक नोकरी- व्यवसाय करणार्या तरुणी मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात. काही जणी दारूही पितात आणि काही जणी हुक्का पितात. मुंढवा, कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या रेस्टॉरंट किंवा बारमध्ये जाऊन त्या हुक्का पितात. माझ्या ओळखीतील कोणतीही तरुणी गांजा किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करत नाहीत. आम्ही ग्रुपमधील मंडळी त्यांना समजावतो. पण, त्या समजत नाहीत. तरुणींनी व्यसन सोडून निरोगी आयुष्य जगले पाहिजे, असे वाटते.
कॉल सेंटरमध्ये नोकरी करणारी नेहा म्हणाली, आमचा सात ते आठ जणांचा ग्रुप आहे. ग्रुपमधील काही तरुणी कामाच्या ताणामुळे धुम—पान करतात. दिवसाला किमान तीन ते चार सिगारेट त्या ओढतात. मला व्यसन करायला आवडत नाही. म्हणून मी त्यांना थांबवते. पण, जाऊ दे गं टेन्शन खूप आहे, वर्क लोड आहे म्हणून त्या सिगारेट पितात, पार्टीतही दारू पितात. त्यांना आम्ही समजावतो. पण, त्या ऐकत नाहीत. मुलींनी व्यसनाच्या आहारी जाणे योग्य नाही. त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. कामाचा ताण असेल तर आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवा.
हेही वाचा