

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने प्रमाणित कार्यपद्धती (मानक कार्यप्रणाली तथा एसओपी) निश्चित केली आहे. संबंधित मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून, त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कर्जमुक्ती योजना सुरू केली असून महाआयटीमार्फत १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी १३ लाख ४८ हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू असून पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वीच मयत झाल्याचे बँकांच्या निदर्शनास आले आहे. शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने अशा कर्जखात्यांसाठी वारस नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार आहे. तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी किंवा प्रमाणीकरणाच्या वेळी ॲग्रिस्टॅक नोंदणी अथवा फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. एका मयत शेतकऱ्याच्या कर्जखात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषांनुसार कर्ज रकमेतील त्यांच्या हिस्स्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात वर्ग केली जाईल. मात्र, योजनेच्या निकषांनुसार एखादा वारस अपात्र ठरल्यास त्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही.`
संबंधित कर्जदार शेतकरी मयत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर बँकेने आपल्या प्रचलित धोरणानुसार कर्जखात्यावर वारसांची नोंद करावी. त्यानंतर योजनेच्या पोर्टलवरील ‘मृत खातेदारांची खाती अपलोड करा’ या सुविधेद्वारे वारसांची माहिती अपलोड करावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत तपासणी करणे आवश्यक राहणार आहे.