

राजगुरुनगर : मित्रांसोबत पर्यटनाला गेलेल्या एकाचा पाण्यातील दगडावर डोके आपटून मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील नायफड येथे मंगळवारी (दि २०) सकाळी अकरा वाजता घडली. त्याने कठड्यावरून सुर मारला पण तो पाण्यातुन वर आलाच नाही. बराच अवधी लागल्यावर घाबरलेल्या मित्रांनी पाण्यातुन त्याला बाहेर काढले. पण त्याची हालचाल थांबलेली होती.
मिळालेली माहिती अशी की, राजेश रामदास वरघट (वय ३५) सध्या रा. शिरोली, ता. खेड (मुळगाव रा. इटकिअंतरगाव , ता.दर-यापुर जि. अमरावती) हा त्याचे दोन मित्र व त्याची पत्नी सकाळी शिरोली येथुन नायफड येथे फिरण्यासाठी गेले होते. नायफड येथे पोहचल्यानंतर तेथे असलेल्या एका छोटया तळ्यामध्ये राजेश वरघट व त्यांचे दोन मित्र पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी राजेश याने त्या तळ्यामध्ये सुर मारला. काही वेळ झाला तरी तो पाण्यातून वर आला नाही. बराच अवधी लागल्यावर घाबरलेल्या मित्रांनी पाण्यात उतरुन राजेशला बाहेर काढले. त्यावेळी राजेशच्या कपाळाला मोठी जखम व रक्तस्त्राव झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यावेळी त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी चांडोली ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले. चांडोली येथील डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा राजेशला मयत झाल्याचे घोषित केले.
राजेश हा शिरोली येथे वास्तव्यास तर खेड बाजार समिती आवारात होणाऱ्या भाजीपाला बाजारात हमाली काम करीत होता. झालेल्या घटनेबाबत त्याचा भाऊ रोहित वरघट याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पाण्यात सुर मारल्याने तेथे असलेली दगड राजेशच्या डोक्याला लागली असावी असे भावाने तक्रारीत नमूद केले आहे.