

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज (दि. ४) मोठी घोषणा केली. त्यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात आहे. पण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने पक्ष सोडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे इंदापूरची विधानसभेची उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे पुत्र निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप तालुका कोअर कमिटीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन पाटील आणि कन्या भारतीय युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांनी आपल्या मोबाईलवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे स्टेट्स ठेवले आहे.
गुरुवारी (दि.३) पाटील यांनी पुत्र राजवर्धन आणि कन्या अंकिता पाटील- ठाकरे यांच्यासह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. जवळपास एक तास त्यांची चर्चा झाली. आज शुक्रवारी (दि.४) हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रवेश आणि पुढील राजकीय घडामोडींवर आपली भूमिका जाहीर केली. शनिवारी (दि.५) कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला.