

इंदापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले कुलदैवत इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूर येथे लक्ष्मीनृसिंहाच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांचे माणकेश्वर वाडा येथील हेलिपॅडवर स्वागत करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी आली होती. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि जि. प.चे माजी सभापती, ‘सोनाई’ उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांची उपस्थितीही उठून दिसत होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढविलेले माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधत होती. पाटील यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठी फौज सोबत आणल्याने हा चर्चेचा विषय झाला.
पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच इंदापूरच्या दौर्यावर येत आहेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यांचा हा खासगी दौरा आहे, देवदर्शन आहे. मला वाटले की, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांचे स्वागत करायला आपण यावे. मुख्यमंत्री त्यांच्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
त्यामुळे कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. मी स्वतःच कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेले आहेत. या ठिकाणी सगळे जुने मित्र मला भेटले, राजकारणात सगळेच सगळ्यांना भेटत असतात. मंदिरामध्ये सगळे जुने मित्र भेटले, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्या.
विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविलेले प्रवीण माने हे देखील दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आल्याने त्यांची देखील चर्चा सुरू होती. माने आणि त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीतील प्रमुख नेतेमंडळी या वेळी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले.
देवाभाऊ पावणार का..?
इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मीनृसिंह हे मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत. कुलदैवताच्या दर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर विरोधकही त्यांच्या स्वागताला रांगा लावून उभे होते, त्यामुळे लक्ष्मीनरसिंह हे त्यांचे भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पावले. मात्र, देवाभाऊ विरोधकांना पावणार का? याची चर्चा विनोदाने राजकीय वर्तुळात रंगली होती.
...या मान्यवरांनी केले स्वागत
राज्याचे क्रीडा युवक कल्याणमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. विजय शिवतारे, आ. राहुल कुल, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पद्मजादेवी मोहिते पाटील, पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, मयूरसिंह पाटील, हनुमंत कोकाटे, तेजस देवकाते आदी मान्यवरांनी फडणवीस यांचे स्वागत केले.
निरा नरसिंहपूर येथे हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने आणि अन्य.
पाटील, माने यांची वाढतेय का भाजपशी जवळीक?
विधानसभा निवडणुकीत अगोदरपासूनच इंदापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलेला दिसून आला. तो आजही कायम असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी भाजपला रामराम करत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला. याच पक्षातून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला, तर प्रवीण माने यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवली. महायुती सत्तेत आल्याने पुन्हा पाटील आणि माने यांच्या भाजपशी जवळीकतेच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.