

बारामती: विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिच्यासह तिच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी विवाहितेपने (सध्या रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंकर हासपे, दत्तात्रय हासपे, बाळूबाई हासपे, संभाजी हासपे, गोरख हासपे (रा. मालुसरेवस्ती, बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादीचा विवाह 2023 मध्ये आत्याचा मुलगा असलेल्या शंकर याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस तिला व्यवस्थित नांदविण्यात आले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी दिव्यांग असल्याने, तुझ्याकडून कोणतेही काम नीटपणे होत नाही, या कारणावरून तिला शिवीगाळ करत सतत अपमान केला जाऊ लागला.
ती सासरी नांदत असताना सासू व सासरे यांनी पती-पत्नीत भांडणे लावली. तिच्या व्यंगावर बोट ठेवून तिला छोट्या- मोठ्या कारणावरून मारहाण, शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवले जाऊ लागले. दीर संभाजीने दारू पिऊन घरी येत तुझ्या बापाने आम्हाला फसवले, आम्हाला तुझी गरज नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
सासरच्या अन्य मंडळींनी पतीला तिच्यासोबत भांडणे करायला लावली. दि. 7 मार्च रोजी पतीने तिला मारहाण केली. तिने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यावर ते तिला नेण्यासाठी आले असताना दीराने व पतीने तिच्यासह तिच्या वडिलांना मारहाण केली. त्यात तिचे वडील जागीच बेशुद्ध पडले. अन्य लोकांनी भांडणे सोडवत तिच्या वडिलांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.