वाघोली: वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणार्या अतिक्रमणांवर दुसर्या दिवशीही (गुरुवारी) कारवाई सुरू होती. महामार्ग, तसेच महामार्गाला जोडणार्या मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेली अतिक्रमणे या वेळी जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका, पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. परिसराने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महामार्गावरील मुख्य चौकापर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाची भूमिका पाहता नगर रोड, तसेच मुख्य रस्त्यांवरील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली आहेत. वाघोलीतील गंभीर प्रश्न असणार्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, गेल्या 28 जानेवारीस झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
महामार्ग, तसेच महामार्गाला जोडणार्या मुख्य रस्त्यांच्या कडेला झालेल्या अतिक्रमणांवर बुधवारनंतर (दि.29) गुरुवारीदेखील पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. महामार्गालगतच्या व्यावसायिकांनी स्वताःहून शेड, टपर्या, बोर्ड आदी अतिक्रमणे काढून घेतली आहेत.
महामार्गालगतची तसेच आव्हाळवाडी रोडच्या कडेला असणारी व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात आली. या वेळी तेथील नागरिकांनी कारवाईला विरोध देखील दर्शविला होता. मात्र अतिक्रमण कारवाई सुरूच राहिली. महामार्ग, तसेच महामार्गाला जोडणार्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
अतिक्रमणे काढण्याचे आवाहन
पुणे-नगर रोडवरील खराडी जकातनाका, उबाळेनगर, वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा, बकोरी फाटा, कटकेवाडी चौक, जगताप डेअरी, ते पेरणे फाटापर्यंत तसेच वाघोलीतील महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते, केसनंद गाव, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणार्या अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे. व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.