पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी हडपसर रेल्वे स्थानक विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हेे काम पूर्ण झाल्यावर लांब पल्ल्याच्या काही गाड्या थेट या स्थानकातूनच सोडण्यात येणार आहेत, तर काही गाड्यांचा शेवटचा थांबा येथेच असेल.
मात्र, हडपसरच्या या विस्तारित रेल्वे स्थानकाकडे जाणारे सध्याचे रस्ते अरुंद आहेत. या ठिकाणी भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानकाकडे जाणार्या तीन मुख्य रस्त्यांची पाहणी करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे.(Latest Pune News)
हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्यांची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाने केली होती. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने स्थानकाकडे जाणार्या तीन मुख्य रस्त्यांची पाहणी केली आहे. हे रस्ते आता रुंद करण्याचा निर्णय देखील पालिकेने घेतला आहे.
सध्याचे रस्ते 9 ते 12 मीटरपर्यंत मर्यादित असल्याने भूसंपादन करून ते प्रस्तावित रूंदीप्रमाणे विकसित केले जाणार आहेत, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. सध्या महापालिकेने एक रस्ता तातडीने विकसित करण्याची तयारी दर्शवली असून, उर्वरित दोन रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.
ताडीगुत्ता चौक ते हडपसर रेल्वे स्थानक मार्गासाठी 30 मीटर रुंद रस्ता प्रस्तावित आहे. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता सध्या केवळ 9 मीटरचा आहे. यासाठी आवश्यक जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. काही ठिकाणी बांधकामे झालेली असली तरी त्यांनी जागा सोडली आहे की नाही, याचा खुलासा अद्याप प्रशासनाकडे नाही.
त्यामुळे येथील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तर कोद्रे दवाखाना (मुंढवा) ते हडपसर रेल्वे स्थानक रस्त्याची प्रस्तावित रुंदी 24 मीटर असून, प्रत्यक्षात तो केवळ 9 ते 10 मीटर आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रुंदीकरण आवश्यक आहे.
हडपसर रेल्वे स्थानक ते मुंढवा रेल्वे क्रॉसिंग पूल या सुमारे 700 मीटर लांबीच्या या रस्त्याची सध्याची रुंदी 9 ते 12 मीटर असून, या मार्गात रेल्वेची मालकीची जागा आहे. रेल्वेकडून जागा मिळाल्यास महापालिका तत्काळ हा रस्ता विकसित करू शकते, असे पावसकर यांनी सांगितले.