एक कोटी 39 लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखेची कारवाई

एक कोटी 39 लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नर्‍हे परिसरातील खाडेवाडी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 1 कोटी 39 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला. यामध्ये काही कच्चा मालदेखील मिळाला आहे.

पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय 27, रा. नर्‍हे, मूळ रा. उत्तर प्रदेश), सुनील पथ्थन सिंग (वय 45, रा. नर्‍हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (28, रा. आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान), चंदन अजयपाल सिंग (वय 32, रा. नर्‍हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आरोपींचा साथीदार नीलेश ललवानी (वय 40, रा, नर्‍हे) याच्यावर गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत 42 वर्षीय पोलिस अंमलदाराने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरू असलेल्या अशा अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेकडून शहर परिसरात गस्त वाढविण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी रात्री नर्‍हे भागातील खाडेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असून, येथून शहर परिसरात गुटखा वितरित होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार युनिट दोन, सामाजिक सुरक्षा विभागासह इतर पथकांनी या गोडाऊनवर छापा टाकला. त्या वेळी येथे गुटख्याचा साठा आढळून आला.

पोलिसांनी येथून 98 लाख 88 हजार रुपये किमतीचा 207 पोती आरएमडी गुटखा आणि 5 लाख 76 हजारांचा चौकीदार गुटख्याचे 20 पोती गुटखा जप्त केला. येथून पोलिसांना काही कच्चा माल मिळालेला असून, पोलिसांनी जवळपास एक कोटी 39 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून रविवारीदेखील याप्रकरणी कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही
कारवाई केली.

गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

राज्यात गुटख्याचे पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील छुप्या पद्धतीने सर्रास गुटखाविक्री केली जाते. पुणे शहरातदेखील गुटखा विक्रेत्यांचे मोठे जाळे असल्याचे पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आरोपी गुटखा तयार करत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, एकाचा शोध घेण्यात येत आहे. येथून पोलिसांना आणखी धागेदोरे मिळाले असून, याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news