

लोणी काळभोर : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः भाजीपाल्याच्या गाळ्यांवर मटक्याचे धंदे सुरू असल्याचे लक्षात आले आहे. काही दिवसांपूर्वी वाहनचालकाचा मोबाईल व शेतमाल चोरीचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील बाजार समितीची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.(Latest Pune News)
शेतमाल, मोबाईल, वाहनाच्या बॅटरी चोरी थांबायचे नाव घेत नाही. तरकारी विभागातील एका आडत्याने ग्रुपवर तक्रार केली आहे. आमच्या पाकळीला पहिल्यापासून मटकावाले बसतात. रात्री 10 ते 11 वाजता शेतमाल येण्यास सुरू होतो. तोच खाऊन-पिऊन चोर चोरी करून घरी जातात. काही दिवसांपूर्वी एकाकडे 50 गड्डी चवळई आली होती. त्यातील 12 गड्डी चोरीला गेली. सुरक्षा रक्षक मटका व्यवसाय आणि चोरांना काही बोलत नाहीत, असेही अडत्याने निदर्शनास आणून दिले.
बाजारात शेतमालाची मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे. गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असताना सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसह आडत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, अडते असोसिएशनची मुदत संपली असल्याने त्यांना संचालक मंडळ विचारत नाही. तर, व्यापारी संचालक देखील दुर्लक्ष करतात. त्यामुळे बाजार घटक हैराण झाले आहेत.
एका वाहनचालकाचा मोबाईल चोरी झाल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माझी बटाट्याची गाडी आहे. गाडी पार्किंगमध्ये उभी होती. सकाळी माझा मोबाईल चोरीला गेला. हा मोबाईल मी हप्त्यावर खरेदी केलेला आहे. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वाहचालकांना येथे कोणतीही सुरक्षा नाही, अशी प्रतिक्रिया संबंधित वाहनचालकाने दिली.
बाजारातील गैरप्रकार व रोज येणाऱ्या वेगवेगळ्या तक्रारी यावरून असे दिसते की सभापती यांनी दुसऱ्यांना वैफल्यग्रस्त म्हणून उपयोग नाही तर स्वतःचा कारभार सुधारला पाहिजे. सभापतींना बाजार समितीचा कारभार योग्य रीतीने सांभाळता येत नाही, यावर एवढेच म्हणता येईल ‘माकडाच्या हाती काकडी’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सभापतींनी तालुक्यात धूर काढत फिरण्यापेक्षा बाजार समितीचा कारभार सुधारण्याकडे लक्ष द्यावे.
प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे
शेतमाल चोरी आणि अवैध धंदे यावर कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा व्यवस्थेला देण्यात येतील. शेतमालाची चोरी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जाईल.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे