

पुणे: हुंड्यासाठी होणार्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोरका झालेल्या जनक हगवणे या त्यांच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा कायदेशीर ताबा वैष्णवी यांची आई स्वाती आनंद कस्पटे यांना देण्यात आला आहे.
सासरच्या छळामुळे गेल्या 16 मे रोजी वैष्णवी यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. त्यानंतर नाट्यमयरित्या त्यांचे बाळ वैष्णवीचे आई- वडील स्वाती व आनंद कस्पटे यांच्या ताब्यात आले होते. (Pune News update)
जिल्हा बाल संरक्षण अधिकार्यांनी बाळाचा सांभाळ व संगोपनासंदर्भात केलेल्या समाजिक तपासणी अहवालाने वैष्णवी यांची आई स्वाती कस्पटे या जनकचा सांभाळ करण्यास योग्य व्यक्ती (फिट पर्सन) असल्याचे स्पष्ट केले. कस्पटे यांच्या घरातील भावनिक व कौटुंबिक वातावरण बाळाच्या हितासाठी अनुकूल असल्यानेच जनकचा कायदेशीर ताबा त्यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याद्वारे जनक याच्या शिक्षणाची, आरोग्याची तसेच सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी टि्वटकरून कळविले आहे.
बालविकास नियम 2015 आणि सुधारित नियम 2021 नुसार एखाद्या बाळाचा ताबा देताना संबंधित व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबरोबरच बाळाच्या संगोपणासाठी आवश्यक असलेले प्रेम त्याला संबंधित कुटुंबियांकडून मिळू शकेल का, याचाही प्रामुख्याने विचार केला जातो. त्यानुसारच जनक याचा ताबा वैष्णवी यांची आई स्वाती यांना देण्यात आला, असे जिल्हा बालकल्याण विभागाच्या महिला आणि बालकल्याण अधिकारी मनीषा बिरारीस यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजातील कन्या वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या बाबतीत जी घटना घडली त्या कारणांसाठी मराठा समाजातील विवाह समारंभ कसे असावेत, त्यामध्ये काय आचारसंहिता असावी म्हणून सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार, दि 1 जून रोजी सकाळी 11 वाजता काळेवाडी येथील आरंभ बैंक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी समाजातील विविध घटकांनी, पुरुष, महिला व युवक, युवती यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, संगिता भालेराव, श्रुतिका पाडळे, मिलन पवार यांनी केले आहे.