

पुणे: व्यापारयुद्धामुळे वाढलेली अनिश्चितता, अमेरिकन डॉलरमध्ये झालेली घसरण, यामुळे सोन्यातील गुंतवणुकीत गेल्या सप्ताहात वाढ झाली. वर्षभरात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 22,360 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत शुद्ध सोन्याचे दर 5 हजार 230 रुपयांनी वाढून 95,670 रुपयांवर गेले आहेत.
जेव्हा जेव्हा जगभरात अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा सोन्यातील गुंतवणूक वाढत असते. खात्रीशीर परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. वायदेबाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड दोन टक्क्यांनी वाढून 3,235.89 डॉलर प्रतिऔंस (28.34 ग्रॅम) वर गेले आहे. गेल्या सप्ताहात वायदेबाजारातील सोन्याच्या दराने सहा टक्क्यांनी उसळी घेतली आहे. यूएस गोल्ड फ्युचरचे भाव 2.1 टक्क्यांनी वाढून 3,244.6 डॉलर प्रतिऔंसवर विसावले.
स्थानिक बाजारात 8 एप्रिलरोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 89,730 रुपये होता. सर्वसाधारणपणे 22 कॅरेटमध्ये सोन्याचे दागिने बनविले जातात. या, 22 कॅरेट सोन्याचा भाव 82,250 रुपये दहा ग्रॅम होता. अमेरिकेने छेडलेल्या शुल्कयुद्धाची अनिश्चितता वाढत असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढली.
परिणामी, गुरुवार दिनांक 10 एप्रिलला शुद्ध सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 2 हजार 940 रुपयांनी वाढून 93,380 रुपयांवर गेले. शुक्रवारीदेखील 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 2 हजार 20 रुपयांनी वाढून 95,400 रुपयांवर गेला. शनिवारी 24 कॅरेटचा दर 270 रुपयांनी वाढून 95,670 रुपये झाला आहे.
सराफी बाजारात गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 2 हजार 700 रुपयांनी वाढून 85 हजार 600 रुपयांवर गेला होता. त्यात शुक्रवारी पुन्हा 1,850 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 87,450 रुपयांवर गेला. शनिवारी (दि.12) सलग तिसर्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 270 रुपयांनी वाढून 95,670 रुपयांवर गेला. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 250 रुपयांनी वाढून 87,700 रुपयांवर गेला आहे.
चांदी लाखमोलाची
शुक्रवारी चांदीचा प्रतिकिलो भाव शंभर रुपयांनी वाढून 97,100 रुपयांवर गेला. शनिवारी (दि.12) चांदीचे भाव 2,900 रुपयांनी वाढून 1 लाख रुपये किलोवर गेले आहेत. गत तीन दिवसांत चांदीचा भाव किलोमागे सात हजार रुपयांनी वाढला आहे.