‘जपान कॉन्सुलेट’कडून पुस्तके भेट

‘जपान कॉन्सुलेट’कडून पुस्तके भेट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मुंबईतील जपान कॉन्सुलेट जनरलकडून जपानचे विविध पैलू दाखवणारी 65 पुस्तके भेट देण्यात आली आहेत. कुलगुरू कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जपानचे मुंबईतील कौन्सुल जनरल यागी कोजी यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना पुस्तकांचा संच भेट दिला. याप्रसंगी कॉन्सुलेट जनरल मुंबई येथील सांस्कृतिक आणि माहिती विभागातील कौन्सुल मेगुमी हामुरो, माजी भारतीय उच्चायुक्त डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.

डॉ. गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध देशांतील नामांकित विद्यापीठांशी शैक्षणिक देवाणघेवाण सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे जपानशीही आपण जोडले गेलो आहोत. लवकरच हे संबंध पुढे नेऊन शैक्षणिकदृष्ट्या चर्चा पुढे नेण्यात येईल, तसेच या कार्यक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जपान यांच्यातील संवाद सुरू झाला आहे. पुढे उच्चशिक्षणासाठी दोघेही एकत्र येऊन काम करतील. तसेच, स्टुडंट आणि फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम सुरू करण्यावर चर्चा करतील, असे जपनाचे मुंबईतील कौन्सुल जनरल यागी कोजी म्हणाले.

विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि जपान कॉन्सुलेट जनरल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2008 पासून निप्पोन फाउंडेशनच्या वतीने 'रीड जपान प्रोजेक्ट 2023' चालवला जात आहे. पुस्तकांद्वारे जपानची ओळख जगाला व्हावी, असा या प्रकल्पाचा उद्देश असून, याअंतर्गत जगभरातील शिक्षण संस्थांना जपानवर इंग्रजी भाषेत लिहिलेली पुस्तके भेट देण्यात येतात. या प्रोजेक्टअंतर्गतच मंगळवारी जपान कॉन्सुलेट जनरल, मुंबईकडून ही पुस्तकांची भेट विद्यापीठाला देण्यात आली. जपानच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी विषयांचे विविध पैलू दाखवणार्‍या पुस्तकांचा या संचात समावेश आहे. ही पुस्तके विद्यापीठातील सामरिकशास्त्र विभागातील ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news