Pune: घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील घाटात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. या वेळी 380 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी शर्यतीत भाग घेतला. भिर्रर... झाली... उचल की उचल की टाक... या पहाडी आवाजात परिसर दुमदुमून गेला. हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेचे नियोजन सद्गुरू सेवा मंडळ घोडेगाव, समस्त ग्रामस्थ मंडळी घोडेगाव, कोळवाडी कोटमदरा, काळेवाडी-दरेकरवाडी, मुंबई व पुणे यांनी केले होते. सकाळी लवकर शर्यती सुरू झाल्या. त्या वेळी घाट प्रेक्षकांनी भरून गेला होता. पाय ठेवण्यासही जागा नव्हती. घाटामध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
शर्यतीचे बैल लांब जाऊ नयेत, यासाठी घाटाच्या शेवटी गोल आळे तयार करण्यात आले होते. स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बैलगाडा दिसावा, यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकाम केले होते.
तसेच घाटाच्या दोन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकडीवरून एकाच वेळी हजारो प्रेक्षक ही बैलगाडा शर्यत पाहत होते. घाटापासून जवळच बैलांना वाहनांमधून उतरविण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे रॅम्प बनविण्यात आल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष कैलासबुवा काळे यांनी दिली.