बारामती तालुक्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे अनेक लाभार्थ्यांना हप्ते मिळाले नसल्याने घराची कामे अर्धवट राहिली आहेत. फेब—ुवारी महिन्यापासून हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याचे अनेक लाभार्थ्यांनी सांगितले. घरकुल योजनेंंतर्गत लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणानुसार बेघर, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणार्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.
शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना, तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गांतील लाभार्थ्यांकरिता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहात होते, यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेचे हफ्तेेे रखडल्याने घराची कामे अर्धवट आहेत.
ऐन पावसाळ्यात घराची कामे थांबल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांचे दुसर्या हफ्त्याकडे लक्ष लागले असून, शासनाने तातडीने उर्वरित रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बारामती तालुक्यातील मंजूर लाभार्थ्यांचे कोणाचेही पैसे आलेले नाहीत. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्वांचे पैसे खात्यावर जमा होतील.
- अनिल बागल, गटविकास अधिकारी बारामती