सीताराम लांडगे
लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 26 फेब्रुवारी रोजी होणारी सर्वसाधारण सभा अतिशय वादळी ठरण्याची शक्यता असून कारखान्याची जमीन विक्री करण्यास तालुक्यांतील तरुणांकडून जोरदार विरोध होत आहे.
कारखान्याची जमीन विक्री न करता कारखाना सुरू करू असे निडणुकीच्या वेळी ऊर बडवून सांगणाऱ्या संचालक मंडळानेच आता जमिन विक्रीचा घाट घातल्याने कारखान्याची जमिन विकून दलाली खाणारे कोण आहेत यावर जोरदार हल्ला तरुणांकडून चढवला जात आहे.
सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेत यशवंत कारखाना सुरू करणे, महसुली देणी देणे, अन्य प्रकल्प मार्गी लावणे यासाठी आर्थिक भांडवल उभे करण्यासाठी जमीन विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर सभासदांकडून असे सांगण्यात येत आहे की, सन 2023 मधील सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली.
निवडणूक बिनविरोध करून खर्चाची रक्कम अधिक निवडलेले संचालक यांच्या माध्यमातून कारखाना पूर्ववत चालू करण्याला प्राधान्य देण्याची भूमिका समोर आली होती, परंतु यातून मार्ग निघालाच नाही, पर्यायाने चुरशीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. आता ज्यांनी कारखान्याची जमीन विकणार नाही असे सांगितले होते, तेच जमीन विक्रीसाठी ऊर बडवू लागले आहेत.
तर कारखान्याची जमीन गिळंकृत करण्यासाठी तालुक्यातील सहकार नेस्तनाबूत करून फक्त जमीन विक्रीसाठी तालुक्यातील दोन्ही संस्थेवर लोकनियुक्त संचालक निवडले असल्याचा घणाघात होत असून या जमीन विक्रीचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचा थेट आरोप होत आहे. कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल किंमतीत विकली जाणार असल्याने या जमीन विक्रीस तालुक्यातून जोरदार विरोध होत आहे.
लोकनियुक्त संचालक मंडळ स्थापन झाल्यावर कारखान्याची एकही गुंठा जमीन न विकता कारखाना चालू करणार या घोषणेला काडीमोड देऊन कारखान्याच्या मालकीची साधारणपणे 117 एकर जमीन विकण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यालाच सभासदांकडून कडाडून विरोध होत असल्याने नेमके या सभेत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.