कोबी, ढोबळी मिरची, शेवगा, घेवड्याची दरवाढ; उर्वरित फळभाज्या स्थिर
गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात 90 ट्रकमधून शेतमाल दाखल
पुणे : लाडक्या गणरायानंतर गौराई आगमनामुळे शेतमालाची तोड कमी प्रमाणात झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डतील तरकारी विभागात कोबी, ढोबळी मिरची, शेवगा आणि घेवड्याची आवक घटली. त्यातुलनेत मागणी अधिक राहिल्याने रविवारी या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली. (Pune Latest News)
बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश हिरवी मिरची 10 ते 12 टेम्पो, इंदूर येथून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, गुजरात, कर्नाटक येथून भुईमूग शेंग 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 9 ते 10 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 100 गोणी, मटार 400 ते 500 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 80 ट्रक इतकी आवक झाली होती.
गौराईच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी पालेभाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. परिणामी, पालेभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत जास्त झाली. तरीही मागणी अधिक असल्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेपू, चाकवत आणि अंबाडीच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली. उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. गौराईमुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात पालेभाज्यांची मोठी खरेदी झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. रविवारी (दि. 31) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 25 हजार जुडी, तर मेथीची 60 हजार जुडी आवक झाली होती. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या जुडीची विक्री दर्जानुसार 3 ते 15 रुपये भाव मिळाला, तर 15 ते 30 रुपये जुडी भावाने किरकोळ बाजारात विक्री होत होती.