पुणे: शहरातील रस्त्यांवरील कचरा आता महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून रात्रीच स्वच्छता मोहीम राबवून उचलला जाणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असून, येत्या आठ दिवसांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा, अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत.
यापूर्वी देखील महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी तक्रारींची दखल घेत घनकचरा विभागाला आदेश दिले होते. उघड्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक अस्वच्छता करणे, बांधकामाचा राडारोडा टाकणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे कारवाई सुरू असताना महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळी देखील कचरा गोळा केला जाणार आहे. नुकतेच महापालिकेच्या ताफ्यात 81 गाड्या (छोटा हत्ती) सामील झाल्या आहेत. यापूर्वी ताफ्यात 270 गाड्या असून, या गाड्यांची संख्या साडेतीनशेच्या पुढे गेली आहे.
शहरात अनेक ठिकाणी, भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून रात्रीच्या वेळी दुकान बंद केल्यानंतर तेथेच कचरा टाकला जातो. हा उघड्यावर पडणारा कचरा आणि नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा रात्रीच उचलण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक वाहनचालक, बिगारी आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाईल.