शंकर कवडे
पुणे : घड्याळाचा काटा पाचवर पोहोचताच कार्यालयातील संगणक बंद करून फाईल व्यवस्थित लावल्यानंतर माझी पावले मंडपाच्या दिशेने धावू लागतात. त्याक्षणी मी बँकेचा कर्मचारी नसतो, तर एक कलाकार होतो. मंडपात पोहोचताच माझ्या आयुष्याला नवा रंग चढतो. पेहराव बदलत मेकअप करून सायंकाळी सातच्या ठोक्याला देखाव्यासाठी सज्ज होणं हा गणेशोत्सवातील नित्यक्रम. (Pune Latest News)
मागील दहा वर्षांपासून मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत आलो आहे. माझ्यासाठी गणरायाचा मंडप हीच रंगभूमी असून गणेशभक्तांच्या जय भवानी, जय शिवाजीची घोषणा आणि टाळ्यांचा गजर हाच माझा सर्वोत्तम पुरस्कार आहे. नोकरी सांभाळूनही ही कला जिवंत ठेवता येते, हेच माझे समाधान असल्याचे कृतज्ञ भाव कलाकार निखिल शेवाळे यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सव म्हटला की आरास, दिव्यांची रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि भजन-कीर्तनांचा स्वर यांचीच आठवण बहुतेकांना होते. पण, या सगळ्या उत्साहात अजून एक मोठे आकर्षण दरवर्षी हजारो भाविकांना खेचून आणते ते म्हणजे जिवंत देखावे. ऐतिहासिक, पौराणिक किंवा सामाजिक संदेश देणार्या गोष्टींची मांडणी मंडपात कलेद्वारे सादर केली जाते. जिवंत देखावे हे प्रमुख आकर्षण ठरत असले तरी त्यामागे कलाकारांची प्रचंड मेहनत दडलेली असते. दिवसभर नोकरी वा शिक्षण सांभाळून संध्याकाळी हे कलाकार मंडप गाठतात आणि काही तासांत पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक व्यक्तिरेखेचं रूप धारण करतात. सातच्या ठोक्याला पडदा उघडताच ते जणू दुसर्याच जगात प्रवेश करतात. रात्री उशिरापर्यंत देखावा साकारताना चेहर्यावरील सादरीकरणातील हावभाव कायम ठेवण्याचे आव्हानही त्यांचेपुढे असते.
दरवर्षीप्रमाणे शहरात यंदाही जिवंत देखाव्यांची संख्या जवळपास चाळीस ते पन्नास टक्के आहे. देखावे हे इतिहास, धर्म आणि समाजजीवनाची जाणीव करून देतात. आजच्या पिढीसाठी हे केवळ दर्शन नसून एक जिवंत इतिहासपाठच आहे. कलाकारांसाठी ही सहज गोष्ट नसते. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नोकरी किंवा शिक्षण सांभाळूनही जिवंत देखाव्यांत भाग घेत अनेक जण बाप्पाच्या चरणी आपली कला सेवा अर्पण करतात.
योगेश शिरोळे, दिग्दर्शक, श्रीमान योगी नाट्यसंस्था.
देखावा साकारताना गणेशभक्तांची दाद मिळाली की सर्व श्रमाचे चीज झाल्यासारखं वाटते. गणेशोत्सवातील जिवंत देखावे हे केवळ सजावट नसून परंपरा, इतिहास आणि सामाजिक संदेश यांचा संगम आहेत. दिवस-रात्र राबणार्या कलाकारांच्या समर्पणामुळेच हे देखावे दरवर्षी प्रेक्षकांना भावतात. कलाकारांसाठी नाट्यगृह मोठं असतं, पण आम्हा कलाकारांसाठी गणेशमंडपच खरा रंगमंच आहे.
- मैथिली जोशी, कलाकार (रिसेप्शनिष्ट)