साखरेच्या तेजीला उधाण! मे महिन्यासाठी 27 लाख टनांचा कोटा देऊनही दरवाढ

साखरेच्या तेजीला उधाण! मे महिन्यासाठी 27 लाख टनांचा कोटा देऊनही दरवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने मे महिन्यातील मागणीचा विचार करून 27 लाख टन साखरेचा मुबलक कोटा खुला करूनही सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या तेजीला उधाण आले आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे. महिन्याचा सुरुवातीचा आठवडा असल्याने बाजारात साखरेला मागणीही चांगली असल्याने तेजीला हातभार लागत असल्याचे सांगण्यात आले. मे महिना म्हटलं की, यात्रा-जत्रा, लग्नसराई, थंडपेय, शीतपेय उत्पादकांची असणारी वाढती मागणी, यामुळे साखरेचा खप नेहमीच्या तुलनेत वाढत असतो. त्यामुळे केंद्राने साखरेचा मुबलक कोटा दिल्याने खरेतर साखरेचे दर क्विंटलला पन्नास रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा बाजारपेठेतून वर्तविण्यात येत होती.

शिवाय, देण्यात आलेला मुबलक कोटा इलेक्शन कोटा असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, साखरेच्या निविदाही क्विंटलला 3600 ते 3650 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सट्टेबाजांची सक्रियता हे त्यामागे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. साखर हंगाम संपुष्टात आल्यामुळे कारखान्यांकडूनही उंच दरात साखर विक्रीला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साखरेच्या दरातील तेजी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास साखरदरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज जाणकार व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.

किमान विक्री दरवाढीच्या शक्यतेने 'बूस्टर'

केंद्र सरकारकडून साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला 3100 वरून 3500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करण्याची साखर उद्योगाची जुनी मागणी आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्यावर काही ना काही सकारात्मक निर्णय होण्याची चर्चा घाऊक बाजारपेठांमध्ये सुरू आहे. त्याचा फायदा घेत सट्टेबाजांकडून साखरेची खरेदी वाढण्यास सुरुवात झाल्याने अनपेक्षित तेजी आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news