अशोक मोराळे
Pune News: बाबा... तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यास मी मदत करू का? असे जर एखादी अनोळखी व्यक्ती म्हणत असेल, तर वेळीच सावध व्हा! कारण, तो ठग तुमच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून, एटीएम कार्डची अदलाबदल करून तुमच्या खात्यातून पैसे काढून घेण्याच्या तयारीत आहे.
शहरात एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना ठगवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रामुख्याने चोरट्यांकडून एकट्या ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात आहे. नवी पेठेतील शास्त्री रोड आणि बाजीराव रोडवर दोन दिवसांत अशा दोन घटना घडल्या आहेत. तर, मागील काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अशी एका ठगाला पोलिसांनी पकडले होते.
घटना क्रमांक एक :
शनिवारी (दि. 23) सायंकाळी धनकवडीतील मधुकर नारायण सावंत (वय 50) हे शास्त्री रोड येथील एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्या वेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आली. त्याने सावंत यांना पैसे काढण्यास मदत करतो, असे सांगितले. येथेच सावंत फसले अन् त्याच्या जाळ्यात अडकले. ठगाने सावंत यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्यांच्या बँक खात्याचा पासवर्ड देखील घेतला.
मात्र, पैसे निघाले नाहीत, असे सांगितले. दरम्यान, याचवेळी ठगाने त्याच्याकडील सावंत यांच्या एटीएम कार्डशी जुळणारे दुसरे कार्ड त्यांच्या हवाली केले. सावंत एटीएम सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने त्याने सावंत यांच्या एटीएम कार्डचा वापर करून दहा हजार रुपये काढून घेतले. जेव्हा बँक खात्यातून पैसे कमी झाले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे सावंत यांच्या लक्षात आले.
घटना क्रमांक दोन:
पौड रोड कोथरूडमधील बाळासाहेब भिकू यादव (वय 54) हे देखील असेच ठगाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना देखील ठगाने 20 हजारांचा गंडा घातला आहे. रविवारी (दि. 24) दुपारी यादव हे बाजीराव रोडवरील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यादव कार्ड टाकून एटीएममधून पैसे काढत होते. त्या वेळी ठग तेथे आला. त्याने सावंत यांच्या परस्पर त्यांचे कार्ड बाहेर काढून कार्ड असे नाही, तर असे टाकायचे असते, असे म्हणाला.
सावंत यांना वाटले तो आपल्याला मदत करतो. मात्र, त्यांचा हा विश्वास त्यांच्यासाठी आर्थिक फसवणूक करणारा ठरला. ठगाने सावंत यांना बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डची अदलाबदल केली. यानंतर सावंत यांच्या एटीएम कार्डचा वापर करून 20 हजार रुपये काढून घेतले. याबाबत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.